
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यासाठी पाच हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट आपण सर्वांनी मिळून साध्य करूया पक्षाचे कार्य पुन्हा एकदा जोराने चालावे यासाठी आता प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कार्यरत व्हायला हवे. आगामी काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिकेची निवडणूक होणार आहे. मतदारांपर्यंत हक्काने पोहोचण्यासाठी व या निवडणुकातही शिवसेनेचा भगवा डौलाने फडकविण्यासाठी आत्तापासूनच कंबर कसुया, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले.
शिवसेनेच्या वेंगुर्ले तालुका कार्यालयात बोलावण्यात आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुतील मोरजकर, युवासेनेचे तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, कोचरा सरपंच योगेश तेली, उपशहरप्रमुख डॉ. आर. एम. परब, युवासेना तालुका संघटक विशाल राऊत, उभादांडा माजी उपसरपंच गणपत केळुसकर, शाखा प्रमुख प्रकाश मोटे, प्रेमानंद जाधव, तालुका सरचिटणीस सचिन राऊळ, समीर दाभोलकर, विभाग प्रमुख नयन पेडणेकर, विक्रांत डिचोलकर, अरुण घोगळे, युवा शहर संघटक वेदांग पेडणेकर व स्वप्निल होसमनी आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतरही वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेनेचे कार्य तळमळीने सुरू आहे. विविध भागात मंजूर झालेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी आमदार दीपक केसरकर स्वतः लक्ष घालत आहेत. त्यामुळे आगामी काळातही वेंगुर्ले तालुक्यातील विकासगंगा त्याच जोमाने प्रवाही राहणार आहे. केसरकर सध्या मंत्री नसले तरी त्याचा विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांच्यावर राज्याची मोठी जबाबदारी नसल्याने गावागावातील लहान मोठ्या कामांकडे लक्ष देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. शिवसेनेचे कार्य अधिक जोमाने सुरू रहावे व कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढावा यासाठी नवीन सदस्यता मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातून नवीन पाच हजार सदस्य बनविण्याचा संकल्प आम्ही केला आहे. तो पूर्णत्वास नेणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असेही पुढे बोलताना वालावलकर म्हणाले.
आगामी काळ हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा आहे. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. राजकारण हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे राजकारणाकडे आपण समाजकारणाच्या नजरेतूनच पहायला हवे. दीपक केसरकर यांनी या भागातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा काही महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. सिंधुरत्न समृद्धी योजनेतून अनेकांचे संसार उभे राहिले आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती / पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सध्या नव्या रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आमदार दीपक केसरकर यांनी स्वतः या योजनेत लक्ष घातले असून मतदारसंघातील तळागाळात या योजनेचा प्रसार सुरू करण्यात आलेला आहे. २२ मार्चपर्यंत अर्ज करणाऱ्यांना बैंकमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून या व्यवसायांसाठी १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदानही देण्यात येणार आहे. वेंगुर्ले तालुक्यातील बहुसंख्य बेरोजगारंनी या योजनेचा लाभ घ्यावा, तालुका व शहर शिवसेनेच्यावतीने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर म्हणाले. उपस्थितांचे आभार युवा सेना तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे यांनी मानले.