वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण २०२३मध्ये कोकण विभागात प्रथम !

Edited by: दिपेश परब
Published on: January 17, 2024 11:08 AM
views 162  views

वेंगुर्ले : नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरी नुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशामध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरातून पश्चिम विभाग ३७ वा, महाराष्ट्रामध्ये ३९ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच वेंगुर्ले शहरास जीएफसी १ स्टार व ODF ++ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

     वेंगुर्ले नगरपरिषदमार्फत प्रत्येक घरोघरी १०० टक्के विलगीकृत कचऱ्याचे संकलन केले जाते. या विलगीकृत कचऱ्याचे नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ (कंपोस्ट डेपो) येथे विविध २७ प्रकारात वर्गीकरण केले जाते. संकलित करण्यात आलेल्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती तसेच जैविक खत निर्मिती केली जाते. सुक्या कचऱ्याचे उपयोगानुसार विविध प्रकारात वर्गीकरण करून त्याची विक्री केली जाते. शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्ते या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता करण्यात येते. शहरातील सार्वजनिक शौचालयांचे नियमितपणे देखभाल दुरुस्ती करून स्वच्छता राखण्यात येते.

 शहरातील सार्वजनिक विहिरी, तलाव यांची साफसफाई करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. शहरातील गटारे , व्हाळी यांची नियमितपणे स्वच्छता करण्यात येते. शहरांमध्ये सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले जाते. नगरपरिषद मार्फत वर्षभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, स्वच्छता जनजागृतीपर विविध कार्यक्रम व यामध्ये स्वच्छताप्रेमी वेंगुर्लेवासियांचा मिळणारा उत्स्फूर्त सहभाग या सर्वामुळे वेंगुर्ले नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये घवघवीत यश प्राप्त झाले आहे. आतापर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले असून मुख्याधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता दूत, सामाजिक संस्था व नागरिक यांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त झाले आहे, असे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले.