प्रसन्ना देसाई यांचा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मान

Edited by: दिपेश परब
Published on: December 30, 2025 19:54 PM
views 8  views

वेंगुर्ले : समाजातील दुर्बल, गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी सातत्याने निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदाचा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे प्रसन्ना देसाई यांना प्रदान करून त्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात पुरस्काराचे मानकरी प्रसन्ना देसाई यांनी समाजसेवेतील अनुभव कथन करताना सांगितले की, सामाजिक कार्य हे केवळ मदतीपुरते मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. अपंग व्यक्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, तसेच सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या समाजघटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

या सन्मान सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये श्री. सुनिल घाग (खानोली), श्रीमती स्वरूपा संजय वसरगावकर (वेंगुर्ला), श्री. शामसुंदर नारायण लोट (भडगाव - कुडाळ), श्री. प्रकाश तुकाराम वाघ (तरदळे - कणकवली ) आणि श्री. ललित गावडे (कसाल) यांचा समावेश होता.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रसन्ना देसाई यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे सांगितले. तसेच सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल ही संस्था अपंगशक्ती व्यक्तींच्या शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन व समाजमुखीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून समाजात संवेदनशीलता निर्माण करण्याचे कार्य करत असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचा समारोप प्रेरणादायी वातावरणात झाला असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.