
कणकवली : आजचे युग हे स्पर्धेचे आणि वेगाने बदलणारे युग आहे. या बदलत्या काळात पत्रकारितेचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून ती आता डिजिटल झाली आहे. मात्र, स्वरूप बदलले तरी पत्रकारिता हा आजही 'समाजाचा आरसा' असून सामान्यांचे प्रश्न मांडण्याचे ते सर्वात प्रभावी ठिकाण आहे, असे प्रतिपादन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी व्यक्त केले.
कणकवली कॉलेज च्या माध्यमातून ल. गो. सामंत विद्यालयात आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरात भगवान लोके बोलत होते. यावेळी कणकवली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष उमेश बुचडे, सहसचिव दर्शन सावंत, श्रमसंस्कार शिबिराचे कार्यक्रमाधिकारी प्रा. श्री मनोज कुमार कांबळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक श्रीमती एम.व्ही महाडेश्वर, प्राध्यापक श्रीमती एस. बी.हरकुळकर, प्राध्यापक प्रा. धवन आधी उपस्थित होते. भगवान लोके म्हणाले, पूर्वी एखादी बातमी वाचण्यासाठी लोकांना दुसऱ्या दिवसाच्या वृत्तपत्राची वाट पाहावी लागत होती. मात्र, आजच्या डिजिटल युगात क्षणार्धातील घडामोडी तत्काळ उपलब्ध होतात. डिजिटल क्रांतीमुळे माहितीचा ओघ वाढला असला, तरी या प्रवाहात काम करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या नैतिक मूल्यांशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे. लोकशाहीने सर्वांना अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली असून, या ताकदीचा वापर विधायक कामासाठी होणे गरजेचे आहे.
कोणतेही क्षेत्र वाईट नसते, तर त्या क्षेत्रात आपण किती निस्वार्थपणे काम करतो, यावर यश अवलंबून असते. आजच्या स्पर्धात्मक जीवनात स्वतःची ओळख आणि ताकद निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच मेहनत घेणे गरजेचे आहे. जे लोक समाजपरिवर्तनासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत, त्यांच्या कष्टाची जाणीव समाजाने ठेवायला हवी.
वृत्तपत्र वाचनाचे महत्त्व सोशल मीडियाच्या जमान्यातही वृत्तपत्रांचे महत्त्व कमी झालेले नाही. वृत्तपत्र वाचल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात काय घडते याची अचूक माहिती मिळते. यामुळे वाचकांची केवळ माहितीच वाढत नाही, तर त्यांची बौद्धिक क्षमता आणि विचार करण्याची पद्धतही प्रगल्भ होते. असे सांगितले.
उमेश बुचडे म्हणाले की, "आपल्याला लिहिण्याचा, वाचण्याचा आणि बोलण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. या अधिकाराचा वापर करून आपण समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्न मांडले पाहिजेत. अशा वैचारिक उपक्रमातून आपल्याला कामाची एक नवीन ऊर्जा मिळते, जी भविष्यातील वाटचालीसाठी अत्यंत आवश्यक असते.
कोणतीही बातमी लिहिताना ती परिपूर्ण असणे गरजेचे असते. त्यासाठी '६ क' (काय, कोठे, कधी, कोण, का आणि कसे) हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सहा प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय बातमी पूर्ण होत नाही. केवळ माहिती देणे म्हणजे पत्रकारिता नसून, सत्यता पडताळणे ही काळाची गरज आहे.
आजचे युग डिजिटल आहे, जिथे माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरते. अशा वेळी आपण अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. चुकीच्या बातम्या किंवा अफवा पसरण्यापासून रोखण्याची जबाबदारी आपलीच आहे. "क्षेत्र कोणतेही असो, त्यात कामाची ओढ आणि आवड असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे आवड असेल, तर तुम्ही त्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकता," असेही बुचडे यांनी नमूद केले.










