
वेंगुर्ले : महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवानिमित्त "जागर स्री शक्तीचा" या उपक्रमांतर्गत दि. २२ ते ३० सप्टेंबर या नऊ दिवसांच्या कालावधीत जिल्हास्तरावरील प्रशासकीय महिला अधिकारी, शैक्षणिक, साहित्यिक, दुध व त्यापासून बनविलेले पदार्थ विक्री व्यवसायातील जेष्ठ महिला व्यावसायिक, आधुनिक महिला शेतकरी, ग्रीन नेचर व इको टुरीझमसाठी काम करणारी महिला, महिला उद्योजक, महिला पत्रकार, महिला वाहक (कंन्डक्टर), महिला लेखिका वा कलाकार, महिलांसाठी समाज प्रबोधन करणारी जेष्ठ महिला, दिव्यांग मधील राज्यस्तरीय महिला खेळाडू अशा महिलांचा खास सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तसेच महिला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून वेंगुर्ले कँम्प येथील मधूसुदन कालेलकर नाट्यगृहात फुगडी महोत्सव याचे आयोजन करण्यात आले आहे. या फुगडी महोत्सवात निमंत्रित फुगडी संघाच्या फुगडीचे सादरीकरण होणार आहे. तसेच स्थानिकांचा नृत्य व गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. तसेच या कार्यक्रमांचा लाभ महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा प्रज्ञा परब यांनी केले आहे.