
सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री नितेश राणे यांनी विभाग प्रमुखांनी क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आज शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील रुग्णालयीन कामकाजाचा सखोल आढावा घेतला. रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य द्यावे, नेमून दिलेल्या कामामध्ये कसूर केल्याचे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देश डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिले.
यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली. अपघात विभाग, औषधसाठा विभागाला भेट दिली. अतिवृष्टी, साथीचे आजार लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज असावी ह्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट दिली. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शाम पाटील उपस्थित होते.