मांडवीखाडीत बुडालेल्या यशचा मृतदेह सापडला !

Edited by: दिपेश परब
Published on: May 15, 2024 07:16 AM
views 1256  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला-मांडवीखाडी पोहण्यासाठी उतरलेला मूळ दोडामार्ग मोरगाव येथील रहिवासी व सध्या गोवा म्हापसा येथे वास्तव्यास असलेला १६ वर्षीय यश भरत देऊलकर याचा मृतदेह आज पहाटे मांडवी खाडीत आढळून आला. 

मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास यश याच खाडीत बुडाला होता. सावंतवाडी तालुक्यातील तळवडा येथे आपल्या मामाकडे यश एका घरघुती कार्यक्रम साठी आला होता. मंगळवारी १४ मे रोजी आपल्या चुलत मावशीसोबत वेंगुर्ला येथे फिरण्यासाठी गेला असता झुलत्या पूलानजिक असलेल्या पाण्यात तो व त्याचा १५ वर्षीय चुलत भाऊ गौरव देवेंद्र राऊळ पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या दाजी बटवलकर या मच्छिमार बांधवाने  गौरव राऊळ याला  वाचवले. मात्र, यश हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर बुडाला. दरम्यान मंगळवारी दुपार पासून यश चा खादीपत्रात शोध सुरू होता. या शोधकार्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने लाईट ची व्यवस्था करण्यात आली होती. मध्यरात्री सुद्धा ही शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली होती. अखेर पहाटे ४ वाजता यश चा मृतदेह पाण्यावर दिसून आला. याबाबत वेंगुर्ला पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यश हा गोवा येथून १० वी ची परीक्षा देऊन मामाकडे आला होता