राणे साहेबांचा शब्द मोडणाऱ्यांना नितेश राणेंचा थेट इशारा

परुळेत अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी उभे रहाण्याचे केलं आवाहन
Edited by: दीपेश परब
Published on: February 03, 2026 08:30 AM
views 70  views

वेंगुर्ला| प्रतिनिधी

महायुतीच्या निर्णयावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. राणे साहेबांचा शब्द अंतिम आहे, तो मोडण्याची वळवळ करणाऱ्यांनी परिणाम भोगायला तयार राहावे, असा सूचक पण स्पष्ट इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी परुळ्यात दिला.

परुळे येथे पार पडलेल्या महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना नितेश राणे यांनी बंडखोर उमेदवार आणि त्यांना सहकार्य कारण्यांऱ्यासमोर थेट भूमिका मांडली. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी महायुतीचा फॉर्म्युला जाहीर केला असून, जागावाटपात परुळेची जागा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सचिन देसाई यांच्या वाट्याला आली आहे, हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

मात्र, निलेश सामंत यांनी उमेदवारी कायम ठेवत माघार न घेतल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करूनही त्याचा मान न राखल्याबद्दल नितेश राणेंनी नाराजी व्यक्त केली.

“राणे साहेबांचा शब्द मोडण्याची हिंमत कोणीही करू नये. ९० चा काळ आठवा. शब्द मोडणाऱ्यांना सोडले जाणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

व्हॉट्सॲपवरून दिल्या जाणाऱ्या धमक्यांवरही त्यांनी जोरदार टोला लगावत, “सुक्या धमक्या देऊ नका, नाहीतर ९ तारखेनंतर माझाच कॉल येईल,” असे स्पष्ट शब्दांत सुनावले.

“महायुतीचा अधिकृत उमेदवार सोडून कोणीही प्रचार केल्यास त्याचा सामना माझ्याशी आहे. ही कायमची गाठ आहे,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना शिस्तीचा इशाराही दिला.

“अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी उभे रहा. निधी कमी पडणार नाही, ती जबाबदारी माझी आहे,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

सभेत उपस्थित राहून संभ्रम दूर करण्यासाठीच आपण आलो असल्याचे सांगत, महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन देसाई यांना निवडून देण्याचे आवाहन नितेश राणेंनी केले.

या जाहीर प्रचार सभेला शिवसेना आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा संघटक सचिन वालावलकर, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, म्हापण जि.प. मतदारसंघाच्या शिवसेना उमेदवार सौ. यद्न्ना साळगावकर, पंचायत समितीचे भाजप उमेदवार विष्णू उर्फ आपा फणसेकर तसेच परुळे पंचायत समितीचे शिवसेना उमेदवार सचिन देसाई यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.