वेंगुर्ला नगरपरिषदेचे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ हे देशासाठी उत्तम उदाहरण : अजयकुमार मिश्रा यांचे गौरोद्गार

Edited by: दिपेश परब
Published on: July 19, 2023 20:34 PM
views 240  views

वेंगुर्ला : या शहरात येऊन मला आश्चर्य झाल. हे एक प्राचीन शहर असून याचा समृद्ध इतिहास आहे. वेंगुर्ला न प ने कंपोस्ट डेपो मध्ये बदल करून त्याचे केलेले स्वच्छ भारत पर्यटन स्थळ हे देशासाठी उत्तम उदाहरण आहे. अशाचप्रकारे देशात इतर ठिकाणी सुद्धा कचऱ्यावर प्रक्रिया व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार. या शहराच्या पर्यटनवाढीच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या ऐतिहासिक डच वखार इमारतीला पुन्हा सुस्थितीत करण्यासाठी केंद्राच्या वतीने योग्य त्या परवानग्या देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी वेंगुर्ला येथे सांगितले. 

लोकसभा प्रवास योजना २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा आज  १९ जुलै रोजी वेंगुर्ला दौ-यावर आले होते यावेळी सर्वप्रथम त्यानी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळला (कंपोस्ट डेपो) भेट दिली. या ठिकाणी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विकसित करणेत आलेल्‍या घनकचरा व्‍यवस्‍थापनाच्‍या विविध प्रक्रिया केंद्रांची पाहणी केली. दैनंदिन संकलित कच-याचे विविध प्रकारात करण्‍यात येणारे वर्गीकरण, ओल्‍या कच-यावर प्रकिया करुन बायोगॅस निर्मिती, सुक्या कच-यापासून तयार होणारा कांडी कोळसा, कच-यावर विविध प्रकारच्‍या प्रकिया करणा-या यंत्रांची माहिती घेतली, तसेच Waste to Best   संकल्‍पनेनूसार विकसित करण्यात आलेले Miracle Park, यमादोरी गार्डन येथे भेट दिली. 

वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या  ‘स्वच्‍छ भारत पर्यटन स्‍थळ’ (कंपोष्‍ट डेपो) ची  पाहणी केल्‍यानंतर मंत्री मिश्रा यांनी नगरपरिषदेच्या कामांची प्रशंसा केली.  एक स्वयंपूर्ण घनकचरा व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प यासोबतच पर्यावरण पूरक असे Miracle Park, यमादोरी गार्डन यांचा समावेश असलेले हे  ठिकाण नाविन्‍यपूर्ण व कौतुकास्‍पद  आहे. अशाच प्रकारचे प्रकल्‍प  संपूर्ण देशामध्‍ये राबविल्‍यास स्वच्‍छ व सुंदर भारत घडविता येईल असे मत त्‍यांनी मांडले. 

यानंतर त्यांनी स्‍वातंत्र्यवीर सावरकर कलादालनास भेट दिली. कोकणी संस्कृती, विविध सण व उत्‍सव, वेंगुर्ल्‍यातील प्रसिद्ध ऐतिहासिक व पर्यटन स्‍थळे यांच्या हुबेहुब प्रतिकृतींसह  माहिती दर्शवणारे वैशिष्‍टयपूर्ण असे कलादालन पाहून ते भारावून गेले. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्‍ये  मंत्री मिश्रा यांचे वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या वतीने  मुख्‍याधिकारी  परितोष कंकाळ यांनी शाल व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले बांबूमध्‍ये कोरलेले  सन्‍मानचिन्‍ह देवून  स्वागत केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात  मुख्‍याधिकारी यांनी  नारायण तलावाचे  पुनःर्जिवीकरण व सुशोभिकरण करणे तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्‍या डच वखार इमारतीचे पुनःर्जिवीकरण करुन त्‍याठिकाणी लेजर,  लाईट शो,  ऐतिहासिक माहिती देणारे संग्रहालय विकसित करण्‍याच्‍या प्रकल्‍पाची माहिती देवून याकामी भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण विभाग (ASI) यांचेकडून आवश्‍यक ती परवानगी मिळणेबाबत व या प्रकल्पासाठी आवश्‍यक निधी नगरपरिषदेस उपलब्ध करुन देणेबाबत विनंती केली

यानंतर मंत्री मिश्रा यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विकसित करण्यात आलेल्या घोडेबाव उदयान, त्रिवेणी उदयान, मानसीश्‍वर उदयान, कवीवर्य मंगेश पाडगांवकर बालोद्यान,  नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृह या ठिकाणी भेटी दिल्‍या. याप्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विकसित करण्‍यात आलेली नाविन्यपूर्ण ठिकाणे, उदयाने, ट्रॅफिक आयलॅड्स तसेच नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृह पाहिल्‍यानंतर या कामांचे कौतुक केले.  वेंगुर्ला सारख्या कमी लोकसंख्‍या असलेल्‍या परंतु ऐतिहासिक वारसा लाभलेल्‍या वेंगुर्ला शहरास भेट देवून समाधान व्‍यक्त केले. नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी अशाच प्रकारे चांगले काम करुन शहराचा विकास करावा असे आवाहन केले. वेंगुर्ला नगरपरिषदेस शक्य तेवढी मदत व आवश्‍यक असणारा निधी उपलब्ध करुन देण्‍याची ग्वाही दिली तसेच भविष्‍यकाळातील केंद्र स्तरावरील विविध स्पर्धामध्‍ये चांगली कामगिरी करण्‍यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या.  

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सहसचिव शरद चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार, भाजप माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, नूतन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक श्री.लेले, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तहसीलदार ओंकार ओतारी, मुख्याधिकारी परितोषिक कंकाळ यांच्या सहित तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नगरपरिषद येथील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.