वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत म्हाडा वसाहत परिसरात स्वच्छ्ता मोहीम !

Edited by: दिपेश परब
Published on: January 17, 2024 11:37 AM
views 131  views

वेंगुर्ला :  बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते  ‘’संपूर्ण स्वच्छ्तामोहीम’’  राबविण्‍यात आली. त्या धर्तीवर महाराष्‍ट्र शासनाकडून ही स्‍वच्‍छता मोहिम राज्‍यभर विस्तारित करण्‍यात येत आहे.  

     जिल्‍हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या आदेशानूसार जिल्‍हयामध्‍ये सर्व ठिकाणी ‘’संपूर्ण स्वच्छ्ता (Deep Cleaning) मोहीम’’ राबविण्‍यात येत आहे. त्‍याअनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे दि. १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ७.०० वाजलेपासून म्हाडा वसाहत, वेंगुर्ला या परिसरात ‘’संपूर्ण स्वच्छ्ता (Deep Cleaning) मोहीम’’ राबविण्यात आली. या मोहीमेअंतर्गत म्हाडा वसाहत परिसरातील उघडयावर टाकण्‍यात आलेला प्‍लॅस्‍टीक कचरा (पॅकेट व बॉटल), काचेच्‍या बॉटल, कागद, कापड, चपला, थर्माकोल इ. प्रकारचा कचरा वर्गीकृत करुन संकलित करण्‍यात आला. रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा असलेले गवत, झाडी ग्रासकटरच्‍या सहाय्याने कटींग करुन साफ करण्‍यात आली. परिसरातील रस्‍ते झाडून स्वच्‍छ करण्‍यात आले. तसेच गटारे साफ करण्‍यात आली. परिसरातील अनधिकृत बॅनर, फलक व जाहिराती हटविण्‍यात आल्या. परिसरातील विविध ठिकाणी टाकलेला राडा रोडा (C & D Waste) हटवून रस्‍ता मोकळा करण्‍यात आला. परिसरातील रस्‍ते धूळ मुक्‍त करण्‍यासाठी नगरपरिषदेच्‍या वॉटर टॅंकरच्या सहाय्याने रस्‍ते धुण्‍यात आले. नाल्यांच्या प्रवाहातील गाळ काढून टाकण्‍यात आला तसेच नाल्‍यामध्‍ये सांडपाणी प्रकिया केंद्र (STP) मधील पाण्‍याचा पुनर्वापर करुन तेच पाणी मारुन नाले  साफ करण्‍यात आले.

     या अभियानामध्‍ये वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी व सफाई कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी तुषार सापळे, उमेश येरम, डॉ. आर. एम.परब, सनी मोरे, म्हाडा सोसायटीचे जयसिंग निगृण, हनिफ म्‍हाळुंगकर व स्‍थानिक रहिवाशी आणि बचत गटांच्‍या महिला सहभागी झाल्या होत्या.