कोकरे व कंकाळ यांच्यासारख्या तत्पर मुख्याधिकाऱ्यांमुळे वेंगुर्ला शहराचा कायापालट : सचिन वालावलकर

शिवसेनेतर्फे परितोष कंकाळ व सचिन वालावलकर यांचा सत्कार
Edited by: दिपेश परब
Published on: April 26, 2023 19:23 PM
views 147  views

वेंगुर्ला :

१५ वर्षांपूर्वीच्या व आजच्या वेंगुर्ल्यात मोठा फरक आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तत्पर असताना काय कायापालट होउ शकतो हे आम्ही पाहिलं. तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सुरू केलेली स्वच्छतेची चळवळ आज विद्यमान मुख्याधिकारी परितोष कंकाळ पुढे घेऊन जात आहेत. आणि याला वेंगुर्लावासीय भक्कम साथ देत आहेत. त्याचमुळेच वेंगुर्ला नगरपरिषद देशात नावलौकित मिळवत असल्याचे गौरवोद्गार शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी काढले. 

   वेंगुर्ला नगरपरिषदेने शहर सौंदर्यीकरण व शहर स्वछता स्पर्धा २०२२ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचा तर नगरपरिषदेला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधी देताना सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सचिन वालावलकर यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्री वालावलकर बोलत होते. त्यावेळी शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डुबळे, शहरप्रमुख उमेश येरम, प्रवक्ते सुशील चमणकर, मच्छिमारसेल प्रमुख गणपत केळुसकर, उभादांडा शाखाप्रमुख प्रकाश मोटे, उपशाप्रमुख शिवाजी पडवळ, महिला शहरप्रमुख श्रद्धा बाविस्कर- परब,  युवासेनेचे संतोष परब, अल्पसंख्यांक शहर संघटिका शबाना शेख, प्रभाकर पडते, शाखाप्रमुख राजू परब आदी उपस्थित होते. 


 सिंधुदुर्ग जिल्हा कसा विकसित होईल व  पर्यटनाला चालना देण्यासाठी दीपक केसरकर सातत्याने काम करत आहेत. या २०२२- २३ वर्षात वेंगुर्ला शहराला दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सिंधुरत्न योजनेतून १० कोटी रुपयांच्या निधी सहित एकूण २२ ते २५ कोटी एवढा निधी देण्यात आला आहे. तर निशाण तलाव पाण्याची उर्वरित पाईप लाईन साठी ६ कोटी चा निधी लवकरच देण्यात येणार आहे. असेही यावेळी सचिन वालावलकर म्हणाले. 

शहरप्रमुख उमेश येरम यांनी यावेळी नगरपरिषद राज्यात अव्वल येण्यात मुख्याधिकारी यांच्या सोबतच शहरातील नागरिक, अधिकारी, कर्मचारी, स्वछता कर्मचारी यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. तर दीपक केसरकर यांनी शहराला मोठा निधी दिला त्यामुळे अनेक विकासकामे होऊ शकली. झुलता पूल, लाईट हाऊसवर जाणाऱ्या पायऱ्या सहित इतर इमारती आकर्षण ठरले. त्यामुळे आता मुख्याधिकारी कंकाळ यांनी सातत्याने काम करून भारतामध्ये प्रथम येण्यासाठी प्रयत्न करावेत असे सुनिल डुबळे यांनी सांगितले.