जमिनीच्या वादातून कोयता - दांड्याने दोन गटात हाणामारी

Edited by: दिपेश परब
Published on: July 19, 2023 22:26 PM
views 184  views

वेंगुर्ला : तालुक्यातील पेंडुर येथे जमिनीच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. या हाणामारीत दोन्ही गटातील व्यक्तींनी कोयत्याने व दांड्याने मारामारी केल्याने यातील ६ जणांना ओरोस जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पेंडुर येथील रमेश चंद्रकांत कांबळी व उमेश चंद्रकांत कांबळी यांना वेंगुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडला. दरम्यान रात्री उशिरा याबाबत वेंगुर्ला पोलिसात गुन्हे दाखल करून यातील रमेश व उमेश यांना आज १९ रोजी अटक करण्यात आली आहे. 

 याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेंडूर येथील सुचित्रा गोपाळ कांबळी (२२) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार येथीलच आरोपी चंद्रकांत कांबळी, रमेश चंद्रकांत कांबळी, उमेश चंद्रकांत कांबळी, रिया रमेश कांबळी यांनी आपल्या शेतात काम करत असलेले फिर्यादीचे वडील गोपाळ कांबळी व काका आनंद कांबळी यांना दांड्याने मारहाण केली तसेच काकी शांती कांबळी हिला पाठीवर मारून दुखापत केली तर सुचित्रा व तिची आई लक्ष्मी या दोघी सोडवण्यास गेले असता यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोकीवर वार करून गंभीर दुखपत केली आहे. दरम्यान या गुन्ह्यात सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी रमेश कांबळी उमेश यांना पोलिसांनी आज अटक केली असून उर्वरित रिया कांबळी व चंद्रकांत कांबळी याना अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

  दरम्यान येथीलच फिर्यादी रमेश चंद्रकांत कांबळी (४२) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गोपाळ धोंडू कांबळी, लक्ष्मी गोपाळ कांबळी, सुचित्रा गोपाळ कांबळी, राजश्री गोळाप कांबळी, आनंद धोंडू कांबळी यांनी फिर्यादी यांनी लावलेल्या भात शेतीचे नुकसान करत असताना विचारणा केली असता फिर्यादी याना शिवीगाळ करून फिर्यादी रमेश कांबळी यांना डोकीवर कुदळ मारून दुखापत केली तर त्यांचा भाऊ उमेश यांना दुखापत करून गळा आवळून खाली पडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यात वरील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव व महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान करत आहेत.