यशवंतगड इथं सूचनाफलकाचं अनावरण

Edited by:
Published on: July 25, 2025 15:46 PM
views 45  views

वेंगुर्ले : राज्य संरक्षित स्मारक असलेल्या महाराष्ट्राच्या व गोवा राज्याच्या सीमेला लागूनच समुद्रकिनारी वसलेल्या ऐतिहासिक यशवंतगड किल्ला, रेडी येथे कित्येक देशी, विदेशी पर्यटक संपूर्ण वर्षभरात भेट देत असतात. त्याच अनुषंगाने गेली ९ वर्षे यशवंतगडाचे आताचे स्वरूप पालटण्यास महत्वाचा वाटा असलेली यशवंतगड शिवप्रेमी, दुर्गरक्षक प्रतिष्ठान रेडी ही संस्था गड संवर्धन संगोपनाचे कार्य निःस्वार्थपणे करीत आहे. यशवंतगडाच्या भिंती व इतर अवशेष जसे की तटबंदी, मंदिर,सभागृह,वास्तू ह्या सर्वांचे रक्षण कसे करता येईल ह्यासाठी ही संस्था सदैव कार्यरत असते. यशवंतगडावर विविध सामाजिक  जसे की शिवजयंती,गड संवर्धन मोहिमा, रक्तदान शिबीर, दुर्गामाता दौड, इत्यादी उपक्रम होत असतात.गडावर संवर्धन करताना कित्येक पर्यटकांना गडाचे व वास्तूचे पावित्र्य टिकवण्याबाबत मार्गदर्शन करणे वेळोवेळी शक्य होत नसते.

हीच गोष्ट लक्षात घेऊन दुर्गरक्षक प्रतिष्ठान, (शिवप्रेमी यशवंतगड), रेडी यांच्या माध्यमातून विशेष सूचनाफलकाचे अनावरण रविवारी १३ जुलै रोजी करण्यात आले. त्या प्रसंगी दुर्गरक्षक प्रतिष्ठान चे अध्यक्ष नारायण (पप्पू ) तेंडुलकर, सचिव भूषण मांजरेकर, सदस्य तथा इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे, संकल्प वाडकर हे उपस्थित होते.सदर फलक ची फ्रेम ही रेडी मधील हिंदुत्ववादी शिवप्रेमी श्री. महेश नाईक ह्यांनी विनामोबदला बनवून दिली.

यशवंतगडावर येणारे पर्यटक हे बहुदा, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व इतर राज्यातील असतात.तसेच विदेशी मध्ये रशियन पर्यटकांना हा किल्ला विशेष भुरळ पाडतो. त्याच उद्देशाने ह्या फलकावर मराठी, इंग्रजी व रशियन भाषेत भाषांतरीत करुन विशेष सूचना लिहिल्या गेल्या आहेत.

त्या अश्या की, गड किल्ले फक्त दगड मातीचे नसून आपल्या महाराजांचे श्वास आहेत, हिंदवी स्वराज्याचे प्रतीक आहेत. गड किल्ल्याचे पावित्र्य राखण्यासाठी किल्ल्यावर तंबाखू-गुटखा,मद्यपान,धूम्रपान करू नये.तसेच गडाच्या भिंतीवर काहीही लिहू नये.अश्लील चाळे तसेच चित्रपटांचे किंवा इतर व्यावसायिक तसेच गडाच्या पावित्र्याला धक्का पोहोचेल असे चित्रीकरण,प्री वेडिंग,पोस्ट वेडिंग,फोटोशूट व छायाचित्रीकरणासाठी गडावर येऊ नये. सदर गोष्टी करताना आढळल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ह्या सूचना वाचून व त्यांचे पालन करुन गडावर होणारे गैरप्रकार यांना वेळीच आळा घालता यावा व वास्तूचे सौंदर्य अबाधित राहावे हाच ह्या उपक्रमाचा हेतू आहे.