भाज्या खातायत 'भाव' !

Edited by: विनायक गावस
Published on: July 07, 2023 11:33 AM
views 181  views

सावंतवाडी : भाज्यांचे भाव रॉकेटच्या वेगाने धावत आहेत. टोमॅटोचा भाव 120 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्याचबरोबर आले-हिरवी मिरचीचा भाव 400 रुपये किलोवर पोहोचला आहे. आलेही 350 रुपये किलोने विकले जात आहे. सरकारने ही दरवाढ तात्पुरती असल्याचे म्हटले आहे. येत्या 15 ते 30 दिवसांत दर कमी होतील असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु, हा भाव लवकर कमी होण्याची शक्यता नाही. येत्या काही दिवसांत बटाटा आणि कांद्याचे भावही गगनाला भिडू शकतात अशी माहिती समोर येत आहे.


जूनच्या पहिल्या आठवड्यात उष्ण वाऱ्यांचा प्रभाव यामुळे जवळपास सर्वच जीवनावश्यक भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यातच टोमॅटोच्या भावात सर्वाधिक वाढ होत आहे.मार्च-एप्रिलमध्ये गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाले. त्याचाही परिणाम यावर दिसून येत आहे. भाज्यांची भाव खाल्याने गृहिणींच बजेट कोलमडलं आहे.‌ गॅस सिलिंडरचे भाव, वाढती महागाई त्यात आता भाज्या देखील भाव खात असल्यानं मध्यमवर्गीयांचा खिसा दोन आठवड्यातच रिकामा होत आहे. 


आज महिन्याचं सामान घ्यायला बाजारात गेलो होतो. भलीमोठी पोतडी भरून किराणा होता. टू व्हिलरला कडेने सामानाची पिशवी अडकवत होतो इतक्यात सौ. मंडईच्या कॉर्नरवर सफरचंद घेताना दिसली. गाडीवर ओझ सांभाळताना वैताग आलेला. त्यात मंडईतला चिखल आणि जोरदार पाऊस येण्याची शक्यता म्हणून सौ.ला लांबूनच विचारलं काय ? तर ती लांबूनच ओरडली 120 रुपये किलो. मी स्वगतच म्हटलं स्वस्त आहेत घे घे. सौ खरेदी करून आली. पाऊस चुकवायचा म्हणून पटपट घर गाठलं, जेवणं उरकली. सौ.ला म्हटलं सफरचंद दे आणलीस ती ! तर ती खेकसली कुठची सफरचंद ? अहो टोमॅटो घेतलेत ते पाव किलो 30 रुपयाचे. *: अँड. राजेश पराडकर*