वसई - सावंतवाडी, नियमित विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी

Edited by: विनायक गावस
Published on: August 10, 2023 19:48 PM
views 669  views

सिंधुदुर्ग  : कोकण रेल्वे मार्गावरील वसई रोड स्टेशन (महाराष्ट्र) आणि सावंतवाडी, सिंधुदुर्ग दरम्यान नियमित विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मोठ्या संख्येने कोकणातील लोक वसई आणि महाराष्ट्राच्या जवळपासच्या भागात काम आणि व्यवसाय इत्यादीसाठी राहतात. ते त्यांचे मूळ गाव कोकण आहे‌. वसई दरम्यान वारंवार प्रवास करतात. मात्र, सध्या वसई रोड स्थानकावरून सावंतवाडीला जाण्यासाठी थेट नियमित गाडी नाही. त्यामुळे कोकण आणि वसई दरम्यान रेल्वेने ये-जा करण्यासाठी दादर आणि ठाणे रेल्वे स्थानके हाच एकमेव पर्याय उपलब्ध असल्याने अनेक अडचणी आणि गैरसोय होत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर वसई रोड (महाराष्ट्र) ते सावंतवाडी, सिंधुदुर्ग दरम्यान विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. त्यामुळे कोकणातील लोकांच्या खऱ्या सार्वजनिक मागणीचा अनुकूलपणे विचार करून कोकण रेल्वे मार्गावर वसई रोड स्टेशन (महाराष्ट्र) आणि सावंतवाडी, सिंधुदुर्ग दरम्यान नियमित विशेष ट्रेन त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी खा. राऊत यांनी केली आहे.