बांद्यातील विविध समस्यांबाबत तहसीलदारांना निवेदन...!

Edited by:
Published on: June 21, 2023 20:25 PM
views 148  views

सावंतवाडी : बांदा येथील वार्ड क्रमांक ३  मधील गडगेवाडी-निमजगावाडी-गवळी टेंब व शेटकरवाडी येथील सदस्य व नागरिकांकडुन सावंतवाडी तालुक्याचे नवनियुक्त तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच बांद्यातील विविध महत्वाच्या समस्यांवर निवेदने ही यावेळी देण्यात आली. बांद्यात विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त नसल्याने विद्यार्थी तसेच नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच बांदा येथे कायमस्वरूपी पोलीस पाटलाची नियुक्ती देखील महत्त्वाची आहे याबाबत निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे नियोजित उड्डाणपुलाच्या कामास भर पावसात सुरुवात केली असल्याने उद्भवणाऱ्या समस्या व नागरिकांना होणारा मनस्ताप याबाबतही मा.तहसीलदार यांना माहिती देण्यात आली. यावर सदर कंत्राटदार व महामार्ग अधिकारी व नागरिक प्रतिनिधी यांना प्रत्यक्ष समोरासमोर बोलवुन याबाबत योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले. बांदा येथून जाणाऱ्या महामार्गाच्या वर्दळीच्या साईड रोडवर गॅस पाईप लाईनच्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबतही माननीय तहसीलदार यांना माहिती देण्यात आली.

तसेच बांद्यात असणाऱ्या परप्रांतीय तसेच बोगस मतदारांची चौकशी करण्यासंदर्भात विनंती केली असता मा. तहसिलदार यांनी याबाबत निवेदन देण्यास सांगितले व असे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच पावसाळ्यात  दरवर्षी बांद्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर देखील यावेळी मा. तहसिलदार यांचे सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावर आठवड्याभरात उपलब्ध असलेल्या बोटीची ट्रायल घेण्यात येईल, त्याचपमाणे आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सज्ज केली जाईल व स्वतः मा. तहसिलदार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पोलिस अधिकारी, जलसंपदा अधिकारी, नागरीक यांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करणार असुन दररोज पाण्याची पातळी व इतर बाबींवर लक्ष ठेवले जाईल. असेही सांगण्यात आले. यावेळी वार्ड क्रमांक तीन चे सदस्य श्री रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर  यांच्यासोबत निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, हेमंत दाभोळकर, न्हावेली ग्रा.पं सदस्य अक्षय पार्सेकर, ज्ञानेश्वर सावंत , केशव नाईक, शुभम कवठणकर,गुरु कल्याणकर आदी नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त माननीय तहसीलदार श्री श्रीधर पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.