
वेंगुर्ले : पोलीस ‘रायझिंग डे‘ च्या निमित्ताने येथील पोलीस ठाण्याच्या माध्यमातून तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी रंजीता चौहान आणि वाहतूक पोलीस मनोज परूळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
पोलिस रायझिंग डे च्या शेवटच्या दिवशी खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यासह खर्डेकर काॅलेज ते वेंगुर्ला पोलीस ठाणे अशी रॅली काढण्यात आली. वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे आवारात रॅली येताच सामाजिक बांधिलकी दाखवत कार्यक्रम आयोजित करुन समाजातील विशेष कौशल्यपूर्ण व्यक्तिंचा गुलाबपुष्प देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी सन्मान केला. त्यात विद्यार्थ्यांना घडवणारे खर्डेकर काॅलेजचे प्राध्यापक जे. वाय. नाईक, वामन गावडे, कमलेश कांबळी, विवेक चव्हाण, एल. बी. नैताम, तसेच कोणतीही भीती न बाळगता हिंमतीने रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला सांभाळणारी तुळस गावातील हेमलता राऊळ, तसेच आपण अपंग आहोत यात खचुन न जाता जिद्दीने उभं राहुन आपले कुटुंब सांभाळणारे वेंगुर्ला अर्बन बॅंकमध्ये काम करणारे सदानंद परब, तसेच गावातील घटनेची माहिती पोलीस ठाण्यात प्राधान्याने देऊन प्रामाणिक काम करणााऱ्य वेंगुर्ला पाल व तुळस गावच्या पोलीस पाटील रूतिका नाईक व आजगांव गावच्या पोलीस पाटील सौ. पोखरे यांचा पोलीस ठाण्याचे वतीने सन्मान करण्यात आला. उपस्थित काॅलेजचे प्राध्यापक श्री. नाईक व वामन गावडे यांनी देखील पोलीसांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्या विषयी असणारा आदर व्यक्त केला. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी पोलीस हा समाजातील महत्वाचा घटक असुन तो आपल्या साठीच दिवस रात्र कार्यरत आहे. महिला हेडकॉन्स्टेबल रंजिता चौहान यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास व स्थापना कशी झाली याबाबत माहिती दिली. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी उत्कृष्ट पध्दतीने केलेचे दिसुन आले.
महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल रंजिता चौहान यांच्या मार्गदर्शनाने पोलीस ठाणे अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील शाळा, काॅलेजमध्ये विविध उपक्रम सुरु असतात. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे मोलाचे मार्गदर्शन त्या करत असतात. त्यांचे मार्गदर्शनपर वक्तव्य विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच बदल आणतो. अशी प्रतिक्रिया उपस्थित विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यामार्फत व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन रंजिता चौहान यांनी केले.