वंदे भारत उद्या धावणार ; तळकोकणात एकच थांबा !

भरधाव वेगानं धावणारी एक्सप्रेस पहाण्याची सावंतवाडीकरांवर वेळ
Edited by: विनायक गावस
Published on: June 26, 2023 20:59 PM
views 220  views

सावंतवाडी : मुंबई-गोवा वंदे भारत उद्यापासून सुरू होत आहे.  वंदे भारतमधून कोकणातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्याची संधी यामुळे मिळणार आहे. मुंबई ते मडगाव दरम्यानच्या वंदे भारत-एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर या रेल्वेचं उद्घाटन पुढं ढकलण्यात आलं होतं.


मुंबई-गोवा वंदे भारत-एक्स्प्रेस ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटेल ती गोव्यातील मडगाव स्टेशनपर्यंत धावणार आहे. या ट्रेनला आठ डब्बे असून  586 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या मार्गावरील अन्य फास्ट रेल्वेपेक्षा हा कालावधी 3- 4 तास कमी आहे असा दावा रेल्वे प्रशासनानं केलाय. आठवड्यातील सहा दिवस ही रेल्वे धावणार आहे.  ‘वंदे भारत’ मुळे कमी कालावधीत कोकणात पोहचता येणार आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, तळकोकणात केवळ कणकवली स्थानकात या एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शेवटच असणाऱ्या सावंतवाडी रेल्वे स्थानकावर देखील या एक्सप्रेसला थांबा मिळावा अशी विविध संघटनांची मागणी होती. पऱंतु, तळकोकणात केवळ एकच थांबा मिळाल्यानं तळकोकणात भरधाव वेगानं धावणारी एक्सप्रेस केवळ पाहण्याची वेळ आली आहे.