वंदेभारत एक्स्प्रेसची धडक, जनावरांचा मृत्यू

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 09, 2026 19:18 PM
views 104  views

कुडाळ : कुडाळ आणि सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान अचानक बैल आणि म्हैस रुळावर आल्याने मडगावच्या दिशेने जाणारी वंदेभारत एक्स्प्रेसची धडक त्यांना बसली. त्यात त्या जनावरांचा मृत्यू झालाच पण एक जनावर रेल्वेच्या ओव्हरहेड विद्युत खांबाला धडकल्याने तो खांब वाकला आणि विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे कुडाळ पासून मडगावच्या दिशने जाणाऱ्या सर्व गाड्या जागीच थांबल्या. वंदे भारत एक्स्प्रेस डिझेल इंजिन लावून हलवल्यावर विद्युत वाहिनीची दुरुस्ती करण्यात आली आणि तब्बल साडेतीन तासांनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला रेल्वे वाहतूक सुरु झाली. दरम्यान वाहतूक ठप्प झाली असल्याने अनेक प्रवाशांचे मात्र हाल झाले. 

मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणारी वंदेभारत एक्स्प्रेस सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकाच्या दरम्यान कुडाळ जवळ सकाळी साडेअकराच्या दरम्याने आली असता रेल्वे ट्रॅकवर अचानक बैल आणि म्हैस अशी काही जनावरे आली. त्यांना वंदेभारत एक्स्प्रेसची जोरदार धडक बसली त्या जनावरांपैकी एक म्हैस ओव्हर हेड विद्युत वाहिनीच्या खांबाच्या सपोर्टला जाऊन आपटली. त्यामुळे खांब वाकला आणि  ओव्हरहेड वायर खाली आली. कुडाळच्या दिशेचा सर्व वीजपुरवठा खंडित झाला. वंदेभारत एक्स्प्रेससह सर्व गाड्या जागच्या जागी थांबल्या.  त्यांनतर डिझेल इंजिन आणून दुपारी २ वाजण्याच्या सुमाराला वंदे भारत एक्सप्रेस घटनास्थळापासून हलविण्यात आली. त्यांनतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करण्यात आले. दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी रेल्वे वाहतूक सुरु झाली. 

दरम्यान या विचित्र अपघातामुळे कोकण रेल्वे  मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. कुडाळ स्थानकात मांडवी एक्स्प्रेस, उदना एक्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, झाराप स्थानकात राजधानी, सावंतवाडीत दुरांतो एक्सप्रेस, मडुरा स्थानकात मरूसागर एक्सस्प्रेस तर कणकवलीत मंगला एक्स्प्रेस थांबून होत्या. सुमारे साडेतीन तास कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. होती त्यामुळे प्रवाशांना मात्र तेवढा वेळ गाड्यांची वाट पाहावी लागली. त्यात आज आंगणेवाडी जत्रेला आलेल्या भाविकांचा परतीचा प्रवाससुद्धा यामुळे काही काळ लांबला होता. दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक सुरु झाल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे.