कुडाळमध्ये 'वैकुंठ रथ' सेवा मोफत उपलब्ध

ओंकार तेलींचा स्तुत्य उपक्रम
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 24, 2026 15:21 PM
views 22  views

कुडाळ : कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर होणारा अंतिम प्रवास अधिक सन्मानजनक व्हावा आणि शोकाकुल कुटुंबावर येणारा आर्थिक भार कमी व्हावा, या उद्देशाने कुडाळमध्ये मोफत 'वैकुंठ रथ' (शववाहिका) सेवा सुरू करण्यात येत आहे. माजी नगराध्यक्ष ओंकार सुधीर तेली यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून, आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या सेवेचे लवकरच लोकार्पण होणार आहे.

कुडाळमधील प्रसिद्ध व्यापारी कै. सुधीर राजाराम तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा उपक्रम साकारला जात आहे. यापूर्वीही ओंकार तेली यांच्याकडून गेल्या ८ वर्षांपासून 'वातानुकूलित शवपेटी'ची सेवा मोफत दिली जात आहे. आता त्यात 'वैकुंठ रथा'ची भर पडल्याने सामाजिक बांधिलकीचा एक नवा टप्पा गाठला गेला आहे.

सर्वसामान्यांची लूट थांबणार

अनेकदा मृतदेह घरी किंवा स्मशानभूमीत नेण्यासाठी खाजगी वाहनांकडून अवास्तव भाडे आकारले जाते. दुःखाच्या प्रसंगी सर्वसामान्यांना नाईलाजाने जादा पैसे मोजावे लागतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कुडाळ शहर आणि संपूर्ण तालुक्यातील नागरिकांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुडाळ तालुका व्याप्ती: ही सेवा केवळ शहरापुरती मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यासाठी उपलब्ध असेल. रथासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. लवकरच आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या रथाचे लोकार्पण होऊन सेवा जनतेसाठी खुली होईल. कणकवली आणि सावंतवाडी नंतर आता कुडाळमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.