तांबळडेगमधील रस्त्याची दुरवस्था

दक्षिण विकास मंडळाचे उपसभापती अमोल लोके यांना निवेदन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 24, 2026 15:44 PM
views 11  views

देवगड : तांबळडेग गावातील अरविंद कुबल यांच्या घरापासून ते दक्षिणवाडा स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, हा रस्ता तातडीने खडीकरण, डांबरीकरण आणि रुंदीकरण करून मिळावा, अशी मागणी 'दक्षिणवाडा विकास मंडळ (रजि.), तांबळडेगच्या वतीने लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे. यासंदर्भात मंडळाने देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांची देवगड येथे भेट घेतली.

महापुरुष मंदिरापर्यंतचा रस्ता सध्या खड्ड्यांच्या साम्राज्यात हरवला आहे. याच मार्गावरून नियमितपणे एसटी बसची वर्दळ असते. मात्र, रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संपूर्ण रस्ता रेती (वाळू) भागात असल्याने अतिशय अरुंद आहे. समोरून दुसरे वाहन आल्यास साईड देताना वाहन वाळूत रुतण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे.

महापुरुष मंदिरापासून स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता कच्चा असल्याने अंत्यविधीच्या वेळी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर ही परिस्थिती अधिकच बिकट होते. त्यामुळे या कच्च्या रस्त्याचेही डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण सकारात्मक असून यासंदर्भात तात्काळ प्रयत्न करू, असे आश्वासन देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांनी दिले आहे. यावेळी दक्षिणवाडा मंडळाचे अध्यक्ष संतोष कोंयडे, दिगंबर येरागी, सागर मालडकर,पांडुरंग येरागी,संदीप कोळंबकर, रघुनाथ गांवकर, विष्णू धावडे, रोशन कोंयडे, नितीन वेंगुर्लेकर,अमित आडकर आदी ग्रामथ उपस्थित होते,