
सावंतवाडी : कॉम्रेड वैदेही पाटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा वैदेही पुरस्कार नुकताच गोव्यातील 'अर्ज' संस्थेच्या कार्यकर्त्यां मंजुळा शिंत्रे यांना प्रदान करण्यात आला. मालवण येथील नाथ पै सेवांगणच्या सभागृहात पुरस्कार संस्थेचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अॅड. संदीप निंबाळकर, ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर, आडाळी सरपंच पराग गांवकर, लक्ष्मीकांत खोबरेकर आदी उपस्थित होते.
आपल्या आईच्या नावे पुरस्कार देण्याची भूमिका स्पष्ट करताना डॉ. पाटकर म्हणाले कि, स्वतःच्या पलिकडे जाऊन समाजातील दुःखीतांची वेदना समजून घेणं आणि ती कमी करण्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं कौशल्य आहे. असे कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षण, पद, प्रतिष्ठा गरजेची नसते. त्यामुळेच जेव्हा सामान्यपणे जीवन जगत असलेल्या व्यक्ती जेव्हा स्वतःच्या स्वाभाविक जगण्यातून करुणे चे दर्शन घडवतात तेव्हा तो आदर्श ठरतो. म्हणूनच वैदेही पुरस्कार देताना वंचितांविषयी करुणा हा निकष प्रामुख्याने विचारात घेतो. मंजुळा शिंत्रे या सामान्यातील असामान्यतेचे उत्तम उदाहरण आहेत.
देहविक्रयातील महिलांविषयी अनेक गैरसमज समाजात आहेत. या गैरसमजांमुळे देहविक्रयात अडकलेल्या महिल्यांचे परतीचे मार्ग कठीण होतात. सोशल मिडीयामुळे आपण सर्वजण असुरक्षित बनलो आहोत. सोशल मिडीयामुळे अनोळखी व्यक्ती संपर्कात येण्याचे आणि आपल्या निरागसतेमुळे आपल्या मनात विपरीत भावना निर्माण केल्या जाण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
सत्काराला उत्तर देताना शिंत्रे म्हणाल्या, मी गेली वीस वर्षे सामाजिक कामात असले तरी माझा जन्म शेतमजूर कुटूंबातील आहे. सुरवातीला जाॅब म्हणून मी एनजीओमध्ये काम करु लागले. पण लवकरच मला लोकांचे प्रश्न समजू लागले आणि मनापासून त्यात योगदान देऊ लागले. अडचणीत असलेल्या व्यक्तीला आपण मदत करु शकण्याची भावना अपूर्व आनंद देते.
मी काही फारशी शिकलेली नाही, पण वीस वर्षांच्या अनुभवाने खूप काही शिकवले. माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्तीच्या कामाची नोंद आपण घेतली हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत खोबरेकर व पराग गांवकर यांनी प्रास्ताविक केले. आभार ज्योती तोरस्कर यांनी मांडले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, संध्या तांबे, कल्पना बांदेकर आदि उपस्थित होते.











