
वैभववाडी : वैभववाडी तालुका पंचायत समितीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असून सर्व सदस्य सत्ताधारी पक्षाचे आहेत. आमदार, खासदार तसेच पालकमंत्रीही त्याच पक्षाचे असतानाही प्रशासनावर त्यांचा कोणताही वचक दिसून येत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.
पंचायत समितीच्या पहिल्या सभेत अनेक अधिकारी व खातेप्रमुख गैरहजर राहिल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस देण्याचे आदेश सभापतींनी दिले होते. मात्र त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सभेलाही तेच अधिकारी गैरहजर राहिल्याने सत्ताधाऱ्यांच्या आदेशांना प्रशासनात किंमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असे चव्हाण म्हणाले.
भाजपाची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत असल्याचा दावा केला जातो. मात्र वैभववाडी तालुक्यात प्रशासनावरच नियंत्रण नसल्यास विकासकामांना गती कशी मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पदाधिकाऱ्यांचे आदेश प्रशासन पाळत नसेल, तर सत्ताधारी केवळ खुर्ची सांभाळण्यासाठीच आहेत का, असा टोला देखील त्यांनी लगावला.
तालुक्याच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व, प्रशासनावर प्रभावी नियंत्रण आणि जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका आवश्यक असते. मात्र सध्या तालुक्यात निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.










