
वैभववाडी : आचिर्णे येथील गोळीबार प्रकरणाला नवे वळण मिळाले असून गावातील एका शाळेच्या परिसरात एक परवानाधारक बंदूक आढळून आली आहे. ही बंदूक गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या कृष्णा सुरेश कातकर यांच्या वडिलांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक संशय निर्माण झाले आहेत. मंगळवारी रात्री आचिर्णे घाणेगडवाडी येथे शिकारीसाठी जंगलात गेलेल्या तरुणांवर गोळीबार झाला होता.यात एकाचा मृत्यू तर जण जखमी झाला होता.या घटनेनंतर पोलिसांनी परिसराची तपासणी सुरू केली होती.बुधवारी घटनास्थळी तलवार, चप्पल यासह काही वस्तू पोलिसांना सापडल्या होत्या.त्यानंतर गुरुवारी दिवसभर स्थानिक पोलीसांना गावातील एका शाळेच्या आवारात बंदुक असल्याची माहिती मिळाली.पोलीसांनी ही बंदूक ताब्यात घेतली आहे.शाळेच्या आवारात सापडलेली बंदूक ही गोळीबारात जखमी झालेल्या कृष्णा कातकर यांच्या वडीलांच्या नावावरील परवानाधारक आहे. मात्र ही बंदूक नेमकी कोणी आणून ठेवली, ती शाळेत का लपवण्यात आली आणि गोळीबाराशी तिचा थेट संबंध आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, ही बंदूक घटनास्थळापासून दूर शाळेच्या परिसरात आढळल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. गोळीबारात वापरण्यात आलेली हीच बंदूक आहे का, याबाबतही पोलिस तपास सुरू आहे. या नव्या घडामोडीनंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलण्याची शक्यता असून संबंधितांकडून सखोल चौकशी केली जात आहे. प्रकरणातील खरा उलगडा करण्यासाठी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.










