पाल पुनर्वसन सातेरी - रवळनाथ पंचायतनचा उद्या २३ वा वर्धापन दिन

धार्मिक - सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन
Edited by: लवू परब
Published on: April 10, 2026 13:27 PM
views 13  views

दोडामार्ग : पाल पुनर्वसन वसाहतीतील (कुडासे खुर्द) श्री देवी सातेरी व श्री देव रवळनाथ पंचायतनचा २३ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या निमित्ताने दिवसभर भक्तिमय वातावरणात कार्यक्रमांची रेलचेल असणार असून रात्री ऐतिहासिक नाट्यप्रयोगाची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे. सकाळी ९.०० ते ९.३० या वेळेत पुण्याहवाचनाने कार्यक्रमांची सुरुवात होईल. त्यानंतर ९.३० ते १०.३० या वेळेत देवतांच्या मूर्तींना अभिषेक करण्यात येणार आहे. पुढे श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होईल. दुपारी १.०० ते २.०० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ४.०० ते ७.०० या वेळेत स्थानिक कलाकारांकडून भजनांचा बहारदार कार्यक्रम सादर होणार असून भक्तिरसाची अनुभूती ग्रामस्थांना मिळणार आहे. याचबरोबर, रात्री १०.०० वाजता मेणकुरे-डिचोली येथील श्री देवी माऊली कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाकडून ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. या नाट्यप्रयोगाचे आयोजन पाल पुनर्वसन वसाहत ग्रामस्थ मंडळाने केले आहे. धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक पर्वाची सांगता करणाऱ्या या विशेष सोहळ्यास भाविक व नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.