समीर वेंगुर्लेकर यांच्या कादंबरीचे रविवारी सावंतवाडीत प्रकाशन

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 10, 2026 13:41 PM
views 22  views

सावंतवाडी : कुडाळ शहरातील पंचायत समिती येथील कर्मचारी तथा कादंबरी लेखक समीर वेंगुर्लेकर यांच्या अभिनंदन प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'वारसदार ' या कादंबरीचे प्रकाशन रविवार 12 एप्रिल रोजी सायं. 5 वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आंबेडकर चौकातील साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.संध्या तांबे यांच्या हस्ते ' वारसदार '  कादंबरीचे प्रकाशन होणार असून साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक विठ्ठल कदम आणि मधुकर मातोंडकर यांनी केले आहे.

समीर वेंगुर्लेकर गेली अनेक वर्ष निष्ठेने साहित्य लेखन करत असून कथा - कादंबरी असे दीर्घ लेखन ते सातत्याने करत असतात. यापूर्वी त्यांचा एक ग्रंथ प्रकाशित झाला असून आता वारसदार ही त्यांची कादंबरी प्रकाशित होत आहे.वारसदार कादंबरी संदर्भात प्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांनी अभिप्राय नोंदवला असून ते या कादंबरी बद्दल म्हणतात, वारसदार ही कादंबरी आशयघन कादंबरी असून तिचं लेखन वाचताना वाचकाला ते खेळवून ठेवते. या अर्थाने लेखक म्हणून समीर वेंगुर्लेकर यशस्वी झाले आहेत.त्यामुळेच त्यांच्याकडून पुढील काळात अशा दीर्घ लेखनाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर घडत जाणारी ही कादंबरी वाचकाच्या दृष्टीने प्रचंड उत्सुकता वाढविणारी असून ग्रामीण भागातील माणसाच्या परंपरेच्या मानसिकतेचा नेमका वेध ती घेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विपुल प्रमाणात कविता लिहिली जाते. पण कथा आणि कादंबरी लेखन अपवादाने केले जात असून या अपवादाने केल्या जाणाऱ्या लेखनात समीर वेंगुर्लेकर यांचे नाव अग्रक्रमाने आपल्याला आता घ्यावे लागेल.