सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर तथा दाजी राजम यांचे निधन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 01, 2026 20:18 PM
views 14  views

देवगड : तांबळडेग गावचे जि.प. शाळेतील सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक श्री. प्रभाकर सखाराम तथा दाजी राजम गुरुजी यांचे दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांनी कोटकामते, मोर्वे आदी शाळांमधून अध्यापन व अध्ययनाचे काम पाहिले होते. ते व्यासंगी हरहुन्नरी शिक्षक म्हणून पंचक्रोशीत परिचित होते. 

अखेरच्या श्वासापर्यंत सातत्यपूर्ण तांबळडेग गावच्या सार्वजनिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा लिलाय प्रवास सुरू होतो. त्यांनी विठ्ठल भक्त अशी ओळख निर्माण केली होती. गावच्या संस्थेच्या कामकाजात  त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. त्याहीपेक्षा दाजी राजम या नावाने ओळखले जात होते. सप्ताह सोहळ्यात त्यांचे तल्लीन होऊन नाचणे म्हणजे तरूणाईला लाजवेल असा उत्साह त्यांच्यामध्ये दिसून येत होता. साधी राहणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचा स्वभाव लोभसवाणा होता. त्यांच्या पश्चात पत्नी सावित्री, तीन मुलगे, एक विवाहित कन्या असा परिवार आहे. 

मत्स्यव्यवसाय अधिकारी रत्नाकर राजम यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर तांबळडेगच्या सागर किनाऱ्यावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.