
कुडाळ : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. आज कुडाळ तहसील कार्यालय येथे सुरू असलेल्या EVM Commissioning प्रक्रियेला जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे आणि उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांनी उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेची बारकाईने पाहणी केली.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राहावी यासाठी सुरू असलेल्या ईव्हीएम मशीनच्या तांत्रिक कामकाजाची (Commissioning) जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना कामकाजात कोणतीही त्रुटी राहू नये, याकरिता जिल्हाधिकारी धोडमिसे मॅडम यांनी आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. तहसील कार्यालयातील स्ट्राँग रूमची सुरक्षा आणि यंत्रणांच्या हाताळणीबाबत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या भेटीदरम्यान कुडाळचे तहसीलदार आणि संबंधित निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.










