
वैभववाडी : तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या दहा ते पंधरा अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग चक्क मुख्याध्यापकाने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापकावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील एका गावात असलेल्या घाटमाथ्यावरील असलेल्या संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पीडित विद्यार्थिनींनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित मुख्याध्यापकाने २१ जुलै ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत तायक्वांदो प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने तसेच विविध कारणे सांगून विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केले. सुरुवातीला भीतीपोटी व संकोचामुळे विद्यार्थिनींनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र काही विद्यार्थिनींनी पुढाकार घेत दोन-चार दिवसांपूर्वी हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आणून दिला.
या घटनेची माहिती मिळताच काही स्थानिकांनी संबंधित मुख्याध्यापकाला शाळेत जाऊन चोप दिल्याची चर्चा आहे. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी वैभववाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवला.आज (ता. १) पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.










