
वैभववाडी : आजच्या काळात शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे, मात्र अनेक होतकरू विद्यार्थी केवळ साधनांच्या अभावामुळे मागे पडतात. अशाच परिस्थितीत लोरे येथील अभय पेडणेकर कुटुंबाने दाखवलेली सामाजिक जाणीव आणि माणुसकी गावासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे.त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असं मत सरपंच विलास नावळे यांनी व्यक्त केले.
अभय पेडणेकर कुटुंबीयांनी लोरे नं २ गावातील पाच गुणवंत व होतकरू विद्यार्थिनींना लॅपटॉप भेट दिली.याच वितरण सरपंच नावळे यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाला तंटामुक्ती अध्यक्ष अनिल नराम, ग्रामपंचायत सदस्य विनोद पेडणेकर, प्रकाश मुणगेकर, भगवान पेडणेकर, तसेच दिलीप मांजलकर, सुरेंद्र पेडणेकर यांच्यासह अभय पेडणेकर यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नावळे पुढे म्हणाले, पेडणेकर कुटुंबाच्या गावच्या समाजकार्यात मोठं योगदान आहे.गावातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्याच वाटप यांच्या मार्फत केलं जातं. समाजातील अशा संवेदनशील व दानशूर व्यक्तींचा आदर्श इतरांनी घ्यावा. शिक्षणावर केलेली गुंतवणूक ही कधीही वाया जात नाही. या विद्यार्थिनींनी या संधीचे सोने करावे, अधिक मेहनतीने अभ्यास करून आपले उज्ज्वल भविष्य घडवावे आणि उद्या समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे बनावे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.तसेच पेडणेकर कुटुंबीयांचे त्यांनी आभार मानले.










