
वैभववाडी : इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स (IMA), न्यू जर्सी (अमेरिका) या नामांकित संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) या परीक्षेत तालुक्यातील मूळ नावळे गावची रहिवासी व सध्या कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेली ईशा अभिजीत रावराणे हिने प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे. ही परीक्षा ऑक्टोबर -नोव्हेबर२०२५ मध्ये घेण्यात आली होती.
ईशा रावराणे ही कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या संगणक विभागाचे प्रमुख कै. डॉ. अभिजीत अरविंदराव राणे यांची कन्या आहे. तिने मागील महिन्यात सीएमए ही परीक्षा दिली होती.जगभरातून अनेक जण या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.त्याचा नुकताच निकाल जाहीर झाला असून यामध्ये ईशा ही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. सीएमए हा अभ्यासक्रम जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सीएमए व्यावसायिक, व्यवसायाचे नियोजन, कामगिरी विश्लेषण, जोखीम व्यवस्थापन, बजेटिंग, अंदाज व खर्च व्यवस्थापन अशा क्षेत्रांत मोलाची भूमिका बजावतात. संस्थेच्या आर्थिक आरोग्यासाठी संधी व धोके ओळखून योग्य निर्णय घेण्यास सीएमए मार्गदर्शन करतात. ईशा रावराणे हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वैभववाडी तालुक्यासह कोल्हापूर परिसरातून अभिनंदन होत आहे.










