
दोडामार्ग : तालुक्यातील विरोधकांनी आमच्यावर टीका जरूर करावी; मात्र त्यांनी हे विसरू नये की ते देखील एका काळात सत्तेवर होते. हत्तींचा प्रश्न हा काही आजचा नाही. सन २००२ पासून दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा वावर सुरू आहे. आजपर्यंत प्रत्येक सरकारने या समस्येवर विविध उपाययोजना केल्या; मात्र अपेक्षित यश कोणालाही मिळालेले नाही. त्यामुळे या प्रश्नासाठी केवळ आम्हालाच दोषी धरून लक्ष्य केले जाऊ नये, अशी ठाम भूमिका शिवसेना (शिंदे गट) दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी मांडली आहे.
गवस पुढे म्हणाले की, अलीकडे ‘ओंकार’ हत्ती पकड मोहिमेसंदर्भात न्यायालयाने स्पष्ट आदेश देत, हत्तीला पकडण्यास नकार देत त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे निर्देश दिले होते. मात्र काही हत्तीप्रेमींकडून दोडामार्ग तालुकाच हत्तींचा नैसर्गिक अधिवास असल्याचा दावा केला जात आहे. या भूमिकेला आमचा ठाम विरोध आहे.
“आज आपण शांत बसलो, तर उद्या ‘हत्ती दोडामार्गचेच आहेत’ असा मुद्दा उपस्थित करून केवळ नुकसानभरपाई देण्याचे आमिष दाखवले जाईल आणि हा प्रश्न कायमस्वरूपी आपल्या माथी मारला जाईल. हा धोका ओळखून पक्षीय मतभेद विसरून दोडामार्ग तालुक्यातील सर्व नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे,” असेही गवस यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “एकमेकांवर टीका करण्यासाठी आपल्या सर्वांकडे भरपूर वेळ आहे; मात्र सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तालुक्याचे भवितव्य आणि नागरिकांची सुरक्षितता. हत्तींच्या उपस्थितीमुळे शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. आमच्या सरकारकडूनही या प्रश्नावर अपेक्षित यश अद्याप मिळालेले नाही, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मात्र आम्ही या जबाबदारीतून कधीही पळ काढलेला नाही आणि काढणारही नाही.” “हत्तीमुक्त दोडामार्ग तालुका व्हावा, ही आमची प्रामाणिक भूमिका असून, यासाठी शंभर टक्के प्रयत्न सुरू आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करणे हीच काळाची गरज आहे,” असे आवाहनही गवस यांनी केले आहे. दोडामार्गवासीयांना लवकरच या प्रश्नावर ठोस आणि सकारात्मक निर्णयाची चांगली बातमी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.










