
दोडामार्ग : घोटगेवाडी येथे पाच हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुडगूस घालून येथील बागायती उध्वस्त केली आहे. यात शेतकरी विठ्ठल शंभू गोवेकर व नारायण महाबळेश्वर भणगे यांच्या नारळ, सुपारी व केळींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घोटगेवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून गणेश टस्करासह पाच हत्तींचा कळप वावरत आहे. मंगळवारी रात्री ८च्या सुमारास हा कळप शेतकरी गोवेकर यांच्या बागेत शिरला व रात्री एक वाजेपर्यंत सलग पाच तास नुकसान करत राहिला. डोळ्यादेखत उभ्या बागायती नष्ट झाल्याचे पाहून गोवेकर यांना अश्रू अनावर झाले. तसेच शेतकरी भणगे यांच्याही बागायतीत घुसून अतोनात नुकसान केले. यात नारळ, सुपारी व केळीची झाडे उध्वस्त केली. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. आमचे नुकसान होऊच देऊ नका, अशी आर्त भावना त्यांनी व्यक्त केली.
२०१९ साली तिलारी नदीला आलेल्या महापुरात गोवेकर यांची संपूर्ण बागायत नष्ट झाली होती. त्या संकटातून सावरत त्यांनी पुन्हा बागायती उभी केली होती. मात्र आता पुन्हा हत्तींच्या हल्ल्याने सर्वस्व उद्ध्वस्त झाले आहे. “मी आता पुन्हा बागायती करू शकत नाही. काय करावे?” असा प्रश्न त्यांनी वनविभागाला केला आहे.










