
सावंतवाडी : कोंकण आणि घाटमाथ्यावरील सडे हा विशिष्ट असा अधिवास आहे. गेल्या काही वर्षांपासून या सड्यांनी अनेक संशोधकांचे आणि निसर्ग अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचे एक कारण म्हणजे सड्यांवर वाढणारी संपन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जीवसृष्टी. सड्यांवरील खडकाळ जमीन आणि मातीचे अल्प प्रमाण यामुळे बहुतांश वनस्पती या तृण प्रकारच्या आहेत ज्यांची उंची काही सेंटीमीटर ते मीटर एवढीच असते आणि आयुष्य खूपच क्षणिक असते. झुडुपे किंवा मोठे वृक्ष क्वचितच बघायला मिळतात. पावसाळ्यातील जोरदार पाऊस, वेगवान वारा, कमी पोषकद्रव्ये असणारी जमिन आणि उन्हाळ्यात पडणारे कडक ऊन अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीत येथील जीवसृष्टीला तग धरून आपला जीवनक्रम पूर्ण करायचा असतो. परिणामी येथे वाढणारी जी वसृष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती लेपिड्याग्याथिस क्लाव्हाटा, धोक्यात असलेल्या वनस्पतींच्या यादीत असून बऱ्याच तज्ज्ञांचा अभ्यासाचा विषय बनलेली आहे. पश्चिम घाटातील सड्यांवर आढळणाऱ्या या प्रजातीला बोली भाषेत कोच म्हणतात. १८५१ साली एन. ए. डॅल्झेल याने या वनस्पतीचा शोध चोर्ला (बेळगाव) गावच्या सड्यांवरून लावला. नंतर जवळजवळ १६६ वर्षांनी पुन्हा ही वनस्पती निदर्शनास आली जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळच्या सड्यांवरून डॉ ऋतुजा कोलते आणि त्यांच्या सहकार्यांनी शोधून काढली. त्यानंतर डॉ ऋतुजा कोलते-प्रभूखानोलकर (रा. बेळगाव, दग्रीन कॉन्सेप्ट, पुणे सोबत संलग्न) आणि त्यां चे सहकारी राहुल प्रभूखानोलकर (जी एस एस कॉलेज, बेळगाव), प्रभा पिल्ले (केरळ), डॉ शरद कांबळे (म. वि. प्र. समाज संस्थेचे कॉलेज, त्र्यंबकेश्वर), डॉ ज्ञानशेखर (एम. सी. सी. कॉलेज, चेन्नई), डॉ. जनार्थनमं (गोवा) यांच्या आठ नऊ वर्षे सुरु असलेल्या सखोल निरीक्षणांनुसार असे लक्षात आले आहे कि, हि प्रजाती दरवर्षी फुलत नाही (मोनोकार्षीक प्लेटेशियल प्रवृत्ती), जसे कारवी आणि बांबूच्या प्रजातींमध्ये दिसून येते. मोनोकार्षीक प्लेटेशियल प्रवृत्तीच्या प्रजातींचे वैशिठ्य म्हणजे एका ठिकाणची सगळी झाडे एकाच वेळेला फुलतात, आणि फळांमधील बी परिपक्व झाली कि सर्व झाडे मरून जातात. बियांपासून नवीन रोपे तयार होऊन पूर्ण वाढ झाल्यावरच परत फुलतात. यामुळेच आपल्याला कार्वीची किंवा बांबूची फुले दरवर्षी दिसत नाहीत, ठराविक कालावधीने दिसतात. अभ्यासकांनी असेच निरीक्षण लेपिड्याग्याथिस क्लाव्हाटा मध्ये नव्याने नोंदवले आहे. त्यांनी हे संशोधन जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा मध्ये प्रकाशित केले आहे. त्यांचे निरीक्षण असे आहे कि, नोव्हेंबर २०१६ मध्ये चौकुळ येथील कोच ची सर्व झाडे फुलली होती. त्यानंतर २०१७ च्या पावसामध्ये सर्व झाडे मरून नवीन रोपे तयार झाली आणि सात वर्षांच्या कालावधीनंतर २०२४ नेव्हेम्बर मध्ये झाडे परत फुलली. या प्रजातीच्या जीवनचक्राबाबत अधिक निष्कर्ष काढण्यासाठी सविस्तर अभ्यास आणि सातत्यपूर्ण निरीक्षणांची आवश्यकता आहे.
लेपिड्याग्याथिस कुळातील बहुतांश प्रजाती प्रदेशनिष्ठ असून त्यांच्यामध्ये सुद्धा असे निरीक्षण आढळण याची दाट शक्यता आहे. या नव्या संशोधनामुळे कोंकण आणि घाटमाथ्यावरील साड्यांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून डॉ. ऋतुजा कोलते आणि त्यांचे सहकारी सड्यांवरील प्रदेशनिष्ठ वनस्पती, त्यांची अनुकूलने, पर्यावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम, जनजागृती, त्यांचे लोकसहभागातून संवर्धन, इत्यादी विषयांवर काम करत आहेत.










