राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचा अजब कारभार

दिशादर्शक फलकावर चुकीची माहिती
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 26, 2025 14:00 PM
views 110  views

वैभववाडी : तळेरे - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलकावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने चुकीची माहिती दिली आहे.वैभववाडीतील कोकीसरे येथून कणकवली अंतर २७किमी व नाधवडे येथून २९किमी अंतर दाखवलं आहे. फलकावर चुकीच्या पद्धतीने दाखवलेल्या अंतरामुळे  अनेकांचा गोंधळ होत आहे.


तळेरे - कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या काॅक्रिटकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे प्राधिकरण विभागाकडून या मार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. मात्र, हे फलकच वाहन चालक व पर्यटकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण करीत आहेत. या विभागाने वैभववाडी शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या कोकीसरे येथे उभारलेल्या दिशा दर्शक फलकावर कणकवलीच अंतर २७ किमी लिहिले आहे. त्यांनतर येथून ७किमी अंतरावर नाधवडे महादेव मंदिरानजीक उभारलेल्या फलकावर कणकवलीच अंतर २९किमी दाखविण्यात आले आहे. त्यामुळे नेमकं कुठल्या फलकावरलील माहिती खरी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.तसेच बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचाही यामुळे गोंधळ होत आहे.