चला कुडाळ घडवूया !

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा स्तुत्य उपक्रम | स्पर्धा परीक्षा - खगोलशास्त्रावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 26, 2025 14:18 PM
views 27  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात आपली चमक दाखवत असतात, मात्र स्पर्धा परीक्षांच्या जगात त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी ‘चला कुडाळ घडवूया’ हा संकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत कुडाळ परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या विनामूल्य मार्गदर्शक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

IAS अधिकारी दत्तप्रसाद शिरसाट यांचे मार्गदर्शन

या उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी, २९ जानेवारी रोजी कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. यावेळी कुडाळचे सुपुत्र आणि अनुभवी IAS अधिकारी दत्तप्रसाद सूर्यकांत शिरसाट यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहेत.

 त्यांनी १७ विविध ऑडिट ट्रेनिंग पूर्ण केले असून ८ ते १० देशांमध्ये प्रशिक्षणाचा अनुभव घेतला आहे. २०१६ च्या ‘इंडो-चायना युथ ऑडिटर फोरम’मध्येही त्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या मुलांनी तयारी कशी करावी, परीक्षेचे टप्पे कोणते आणि यशाची सूत्रे काय, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. नासा आणि इस्रोचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी संधी

केवळ स्पर्धा परीक्षांवर न थांबता, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला खगोलशास्त्र (Astronomy) विषयावर कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नासा (NASA) किंवा इस्रो (ISRO) मध्ये करिअर करायचे आहे, त्यांना या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

मंदार शिरसाट यांनी या उपक्रमाबाबत बोलताना सांगितले की:

विविध क्षेत्रे: आगामी काळात डॉक्टर, वकील, इंजिनिअर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मॉक टेस्ट (सराव परीक्षा) आयोजित केल्या जातील.

विनामूल्य प्रवेश: विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून हे सर्व सेशन्स पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आले आहेत.

जिल्हाभर विस्तार: हा उपक्रम केवळ कुडाळपुरता मर्यादित न ठेवता, जिल्ह्याच्या इतर भागांतून आमंत्रण आल्यास तिथेही हे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.

"सिंधुदुर्गातील मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना योग्य दिशा मिळाल्यास ते प्रशासकीय सेवा आणि जागतिक स्तरावरील संस्थांमध्ये नक्कीच नाव कमावतील, अशी मला खात्री असल्याच मंदार शिरसाट यांनी सांगितलं.

या अभिनव उपक्रमामुळे कुडाळसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ग्रामीण भागातील मुलांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.