वैभववाडी पंचायत समितीत पत्रकार कक्षाचे नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

जिल्ह्यातील पहिला पत्रकार कक्ष ठरला वैभववाडीत | पत्रकार समितीकडून पालकमंत्र्यांचा सत्कार
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 26, 2025 15:57 PM
views 211  views

वैभववाडी : वैभववाडी पंचायत समितीत पत्रकार कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रविवारी (दि. २६ ऑक्टोबर) करण्यात आले. या पत्रकार कक्षामुळे तालुक्यातील माध्यम प्रतिनिधींना कार्य करण्यासाठी एक स्वतंत्र, सुसज्ज व हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर उभारला गेलेला हा पहिलाच पत्रकार कक्ष ठरला आहे.

हा कक्ष पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून शक्य झाला असून त्यांनी वैभववाडी तालुका पत्रकार समितीसाठी पंचायत समिती भवनामध्ये योग्य जागा उपलब्ध करून दिली. या उपक्रमाबद्दल वैभववाडी तालुका पत्रकार समितीने पालकमंत्री राणे यांचे आभार मानले असून त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सभापती अरविंद रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, तालुका पत्रकार समितीचे एकनाथ पवार,महेश रावराणे, उज्ज्वल नारकर, प्रा.सुरेश पाटील, नरेंद्र कोलते, स्वप्नील कदम, श्रीधर साळुंखे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.