
वैभववाडी : वैभववाडीच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होत आहे. अक्षरवैभव साहित्य कला मंच वैभववाडी आणि प्रभा प्रकाशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने १६ नोव्हेंबर रोजी वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात पहिलं अक्षरवैभव साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन (वसई) यांची निवड करण्यात आली आहे.अशी माहिती प्रभा प्रकाशनचे संचालक कवी अजय कांडर, अक्षरवैभवचे अध्यक्ष प्रा. एन. एस. पाटील, आणि सचिव चेतन बोडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंचाचे पदाधिकारी संदेश तात्या तुळसणकर, सफरअली इसफ, शैलेंद्रकुमार परब, मारुती कांबळे आदी उपस्थित होते.
कांडर म्हणाले, वैभववाडी तालुक्याला साहित्य चळवळीचा मोठा वारसा आहे.कवी नारायण सुर्वे याच तालुक्यातील आहेत.त्यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त आम्ही या साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवी सायमन मार्टिन यांची निवड करण्यात आली आहे.श्री मार्टीन हे मराठी साहित्यातील एक प्रख्यात नाव असून, गेली चार दशके निष्ठेने कविता लेखन करीत आहेत. वास्तववादी विचारसरणी, सामाजिक जाण आणि माणुसकीचा शोध या त्यांच्या कवितेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमुळे त्यांना साहित्यविश्वात विशेष स्थान मिळाले आहे. अनेक प्रतिष्ठित मराठी प्रकाशन संस्थांतर्फे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून, त्यांना विविध साहित्यिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.या संमेलनाला राज्यभरातील विविध कवी उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कांडर यांनी केले.










