
वैभववाडी : महिला बचत गटांच्या उत्पादनांबाबत बाजारपेठेत आजही विश्वासार्हता कायम आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांना नेहमीच मागणी असते. मात्र, बाजारपेठेतील स्पर्धा लक्षात घेऊन बचत गटांनी ग्राहकांच्या गरजा ओळखूनच दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करावी, तसेच पॅकिंग आणि ग्रेडिंगवर विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन तहसिलदार सूर्यकांत पाटील यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत खांबाळे ग्रामपंचायत आणि सहेली ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत आवारात दोन दिवसीय दिवाळी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तहसिलदार श्री. पाटील, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, सरपंच प्राजक्ता कदम, निवृत्त कॅप्टन राजाराम वळंजू, ग्रामसंघ अध्यक्षा सुनिता पवार, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, उपसरपंच मंगेश गुरव, नयना गुरखे आदी मान्यवर उपस्थित होते.
तहसिलदार श्री. पाटील पुढे म्हणाले, “महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी आयोजित करण्यात आलेला दिवाळी खाद्य महोत्सव हा अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम आहे. या ग्रामपंचायतीचा आदर्श तालुका पातळीवर घेण्यात यावा. पुढील वर्षी पंचायत समितीच्या आवारात अशा प्रकारचा मोठा महोत्सव आयोजित करावा,” अशी सूचना त्यांनी केली.
गटविकास अधिकारी श्री. जंगले म्हणाले की, “महिला बचत गटांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ही संकल्पना अत्यंत स्तुत्य असून गावोगावी असे उपक्रम व्हायला हवेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या महोत्सवात महिला बचत गटांच्या विविध पारंपरिक दिवाळी फराळ उत्पादनांसह स्थानिक खाद्यपदार्थांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामस्थ आणि नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.