सडुरे - शिराळे मार्गावर दरड कोसळली

एसटी बस थोडक्यात बचावली
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 18, 2025 13:53 PM
views 302  views

वैभववाडी : तालुक्यातील वैभववाडी- सडुरे-शिराळे मार्गावर दौडोंबा येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती.शिराळे-विजयदुर्ग एसटी बसवर दरडीचा काही भाग कोसळला.मात्र सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.हा प्रकार आज सकाळी ६.४५च्या दरम्यान घडला.सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.

तालुक्यात काल (१७) पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.या पावसामुळे आज सकाळी सडुरे दौडोंबा येथे दरड कोसळली.दरम्यान याचवेळी शिराळेहून विजयदुर्गला जाणारी एसटी बस या मार्गावरून जात होती.त्या बसवर दरडीचा काही भाग कोसळला.सुदैवाने त्यात कोणतीही हानी झाली.दरडीसह झाडे रस्त्यावर आल्याने हा वैभववाडी -शिराळे मार्गावरील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच शिराळे पोलीस पाटील महेंद्र शेळके यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती दिली.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जेसीबी घटनास्थळी दाखल झाले.जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून तासाभराने मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

या घटनेनंतर सडुरे-शिराळे गावचे सरपंच दिपक चव्हाण, उपसरपंच नवलराज काळे , माजी सरपंच विजय रावराणे,कोतवाल मोहन जंगम, सुनील राऊत गावातील युवक राजेंद्र बोडेकर,निलेश बोडेकर, सुजल शिंदे, जयेंद्र बोडेकर यांनी दरड हटविण्यासाठी मदत केली. या घटनेची माहिती मिळताच निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील यांनी, सार्वजनिक बांधकामचे श्री बाबार, श्री इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

.