
वैभववाडी : रोटरी क्लब वैभववाडीच्यावतीने येथील दत्त विद्यामंदिर शाळेला इंग्रजी अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असे इंटरॅक्टिव्ह बोर्ड सॉफ्टवेअर (आज्ञावली) भेट देण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक दिनकर केळकर यांच्याकडे ही आज्ञावली सुपूर्द करण्यात आले.
रोटरी क्लबच्या माध्यमातून तालुक्यात शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबविले जातात.यावेळी शहरातील प्राथमिक शाळेला इंटरॅक्टिव्ह बोर्ड सॉफ्टवेअर भेट देण्यात आले.याद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण अधिक प्रभावी पद्धतीने घेता येईल,या उद्देशाने रोटरी क्लबने हा उपक्रम राबवला. यांच्या वापरामुळे शिक्षकांचे अध्यापन अधिक सुलभ आणि विद्यार्थ्यांचे शिकणे आनंददायी होणार आहे. या कार्यक्रमाला रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर प्रशांत कोलते, अध्यक्ष सचिन रावराणे, प्रशांत गुळेकर, राजीव बिले, विद्याधर सावंत, संतोष कोलते,प्रथमेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.श्री. केळकर यांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.