
सिंधुदुर्ग : पेट्रोल ,डिझेल वापर कमी करा , सोन्यावरील वाढती गुंतवणूक थांबवा.परदेश दौरा करु नका,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला आवाहन करत आहेत.त्यामुळे मंत्र्यांच्या ताफ्यात पुढे आणि मागेचार-चार गाड्या असतात, अधिकारी विविध ठिकाणी वाहने फिरवून पेट्रोल,डिझेलचा गैरवापर करतात. मंत्रांनी गर्दी दाखवण्यासाठी ताफा कमी केला तर मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलची बचत होऊ शकते.मोदींच्या आवाहनाला सरकारकडूनच हरताळ फासला जात आहे.केवळ सामान्य जनता होरपळू नये,असा टोला ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलचे बचतीचे आवाहन केले आहे. परदेशी दौरे थांबवा असे आवाहन मोदींनी केले आहे.परंतु १५ मेपासून पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जात आहेत. दुसरीकडे सामान्य नागरिक पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे हैराण झाला आहे. गरज असेल तरच लोक घराबाहेर पडत आहेत. नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कारणांसाठी टू-व्हीलर वापरणाऱ्या सामान्य माणसावर याचा मोठा परिणाम होत आहे.पेट्रोल दरवाढीमुळे आधीच होरपळणाऱ्या जनतेवर नव्या करांचा बोजा पडणार आहे.सामान्य माणूस या आर्थिक संकटातून बाहेर पडू शकणार नाही,अशी टीका वैभव नाईक यांनी केली.
सरकारी यंत्रणेमधील वाहनांच्या वापराबाबतही शासनाने नियंत्रण केले पाहिजे. तालुक्याच्या ठिकाणी ग्रामसेवकांपासून शिक्षकांपर्यंत, अधिकारी त्यांच्या नेमलेल्या ठिकाणी राहिले तरी इंधनाची बचत होईल,त्याची अलबजावणी करावी.सामान्य लोकांसाठी सोनं ही एक सुरक्षित गुंतवणूक असते. अडचणीच्या काळात उपयोगी पडावे म्हणून लोक थोडं-थोडं सोनं खरेदी करतात. देशहितासाठी लोक सोन्याची खरेदी कमी करतील. मात्र, मोठे उद्योगपती, राजकीय नेते आणि गुन्हेगार मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. त्यांच्यावर सरकार कारवाई करणार का? असा सवाल वैभव नाईक यांनी केला.
मोदी सरकारच्या नोटबंदीच्या काळात सामान्य जनता जशी होरपळली, तशीच परिस्थिती पेट्रोल आणि सोन्याच्या मुद्द्यावर होऊ नये, एवढीच आमची अपेक्षा आहे.सरकारने जनतेला वेठीस धरु नये,अन्यथा ठाकरे शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वैभव नाईक यांनी दिला.











