शहरातील अनधिकृत गोष्टी दाखवून देतो, पहिली त्यांना उठावा

नंतरच भाजी विक्रेत्यांवर कारवाई करा ; शिवसेना नगरसेवक आक्रमक
Edited by: विनायक गांवस
Published on: May 12, 2026 12:41 PM
views 263  views

सावंतवाडी : शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत गोष्टी आहेत. पहिली त्या हटवा अन् नंतर स्थानिक भाजी विक्रेत्यांवर कारवाई करायला या असा इशारा शिवसेना नगरसेवकांनी न.प. प्रशासनाला दिला. ३० वर्ष न.प.ची पावती फाडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक भाजी विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, ॲड सायली दुभाषी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी नगरसेवक देव्या सुर्याजी म्हणाले, वर्षांचे १२ महिने या ठिकाणी हे लोक व्यवसाय करतात. त्यांची पावती न.प. कडून घेतली जाते. न.प.कडून जप्तीची धमकी दिली जात असून व्यवसाय बंद झाला तर त्यांना पोसणार कोण ?  त्यांच्या मुलाबाळांना पोसणार कोण ? असा सवाल त्यांनी केला. तर अधिकाऱ्यांकडून नगराध्यक्षांनी कारवाई करायला सांगितले असं सांगितलं जाते. त्यामुळे अनधिकृत गोष्टी उठवायच्या असतील तर शहरात अनेक ठिकाणी आहेत. आम्ही तुम्हाला त्या दाखवून देतो. त्या पहिली हटवून दाखवा अन् मगच भाजी विक्रेत्यांना उठवायला या असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, जर हे भाजी विक्रेते अनधिकृत असतील तर मग न.प. अधिकाऱ्यांकडून पावत्या कोणत्या आधारावर घेतल्या जातात ? मत मागताना स्थानिकांकडे जाता. आता स्थानिकांनी कुठे जावं ? असा सवाल नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी केला. तर  स्थानिक लोकांना, हातावर पोट असणाऱ्यांना कसं काय उठवलं जात ? असा सवाल नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांनी केला. मी गेली ३० वर्ष इथे व्यवसाय करतो. न.प.कडून पावती देखील गेली जाते. मात्र, आता कारवाई करण्याचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे जगायच कसं हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे अशी खंत भाजी विक्रेत्याने व्यक्त केली. आपल्या शेजारी वृद्ध महिला भाजी विकते. मात्र, कारवाईच्या भितीने ती आजारी पडल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नगरसेवकांनी नगरपरिषदेत धडक देत प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना घेराव घातला. अनधिकृत गोष्टी उठवायच्या असतील तर आम्ही दाखवून देतो त्या सर्वांवर पहिली कारवाई करा. नंतरच गोरगरीब भाजी विक्रेत्यांवर कारवाई करायला या, असा इशारा विरोधी नगरसेवकांनी दिला. यावेळी नगरसेवक देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड सायली दुभाषी, प्रथमेश प्रभू, संकल्प धारगळकर आदी उपस्थित होते.