
कुडाळ : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही, ओरोस बुद्रुक ते कुडाळ या महामार्गावर देखभाल व दुरुस्तीची कामे अद्याप अपूर्ण आहेत. या मार्गावरील ठेकेदार कामे पूर्ण करण्यात कुचराई करत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून केला जात आहे.
महामार्गावर अनेक ठिकाणी झालेल्या अपघातांमुळे सुरक्षा रेलिंग मोडलेल्या किंवा वाकलेल्या अवस्थेत आहेत. ही रेलिंग दुरुस्त करणे आवश्यक असतानाही ती तशीच सोडून देण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळी किंवा पावसाच्या अंधारात या वाकलेल्या रेलिंगचा अंदाज न आल्यास भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
वेताळ बांबर्डे भागात परिस्थिती अधिकच बिकट आहे. मागील वर्षी येथे खड्डे भरण्याचे काम करण्यात आले होते, मात्र ते 'अर्धवट' स्वरूपाचे होते. सध्या हे खड्डे पुन्हा उघड्यावर आले असून, वेगाने जाणाऱ्या वाहनांना येथे मोठे दणके बसत आहेत. यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटून गाडी रस्त्याबाहेर जाण्याचे प्रकार घडू शकतात. या ठिकाणी खड्डे नाही झालेल्या भागाला पूर्ण पॅच डांबरीकरणाने तयार करणे आवश्यक होते मात्र तसे झालेले अजून पर्यंत दिसत नाही.
तसेच, वेताळ बांबर्डे येथील नदी पुलाशेजारील वळणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, अशी आशा गावकऱ्यांना होती. परंतु, हे कामही सध्या अपूर्ण अवस्थेतच पाहायला मिळत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर चिखलामुळे या कामात अधिक अडथळे येणार असून, तोपर्यंत हे काम पूर्ण होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरवर्षी पावसाळा जवळ आला की घाईघाईने कामे उरकली जातात, मात्र यंदा पावसाच्या तोंडावरही ठेकेदार आणि प्रशासन सुस्त असल्याचे चित्र आहे. "ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग खरोखरच झोपले आहे की झोपण्याचे सोंग घेत आहे?" असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे. जर वेळेत ही दुरुस्ती कामे पूर्ण झाली नाहीत, तर पावसाळ्यात या महामार्गावर होणाऱ्या संभाव्य अपघातांना जबाबदार कोण? असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन रखडलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी जोर धरत आहे.











