
सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाने जर्मन देशातील बाडेन वूटेनबर्ग या राज्यासोबत झालेल्या करारानुसार जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पात येथील तरुणांची फसवणूक झाली असल्याचा आरोप माजी आ. वैभव नाईक यांनी केला आहे. तसेच ज्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन त्यांना नियुक्ती पत्र देऊनही अद्याप नोकरी मिळाली नाही अशा उमेदवारांना घेऊन त्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. याबाबत योग्यतो तोडगा काढण्यात यावा अन्यथा आठ दिवसानंतर आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी आपण या पूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन,या बाबत योग्य ती भूमिका घेऊ असे स्पष्ट केले. उद्धवसेना पक्षाचे माजी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली फसवणूक झालेल्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत उपस्थित होते. यावेळी माजी आ. नाईक यांनी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी जर्मन देशातील बाडेन वूटेनबर्ग राज्याशी कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार राज्यातून कुशलमनुष्यबळ जर्मनीला पाठविण्यात येणार होते. त्यासाठी तत्कालील पालकमंत्री रवींद्र चव्हाण व तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थिती जर्मन देशाला कुशल मनुष्यबळ पुरविणे आणि जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग शुभारंभाचा शासकीय कार्यक्रम देखील सावंतवाडी येथे घेण्यात आला होता. मात्र हा कार्यक्रम मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत ७ जुलै २०२४ रोजी पार पडला. त्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात ९२ तरुणांना एका कंपनीमार्फत नियुक्ती पत्र देण्यात आली होती. मात्र नियुक्तीपत्र देऊन आता वर्ष होत आले तरी नोकरी न मिळाल्याने त्यांची शासनाने फसवणूक केली असल्याची भावना या तरुणांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच जर्मनी येथे नोकरी मिळणार असल्याने अनेक तरुणांनी आधी काम करत असलेल्या नोकऱ्या सोडल्या त्यामुळे या तरुणांची सद्या हेळसांड होत आहे. याबाबत तरुणांनी प्रकल्प समन्वयक यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचेही यावेळी त्या तरुणांनी सांगितले. शासन एकीकडे उपक्रम राबविते आणि मग त्याकडे लक्ष देत नाही हे बरोबर नसल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणून आपण या विषयाकडे गांभीर्याने पाहून या तरुणांना नोकरी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत याकडे माजी आ. वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
निवडणुकीच्या तोंडावर गाजर !
मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. दीपक केसरकर यांनी तरुणांना नोकरी देण्याचे गाजर दाखविल्याचा आरोप यावेळी वैभव नाईक यांनी केला. मात्र तरुणाची फसवणूक झाली असून आम्ही तरुणाच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.
'त्या' व्यक्तीकडून सिंधुरत्न योजना काढून घ्यावी
जर्मन भाषा शिकवून जर्मन येथे नोकरी लावण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वयकाने या युवकांची फसवून केली असून अशा व्यक्तीला सिंधुरत्न योजनेची कामे दिली जात आहे. हे योग्य नसून त्याच्याकडून ही योजना काढून घेण्यात यावी अशी मागणी देखील आपण केली असल्याचे यावेळी नाईक यांनी सांगितले.










