मालवण तहसील कार्यालयाने दाखले लवकर द्यावेत

माजी आमदार वैभव नाईक यांची तहसीलदारांना सूचना
Edited by:
Published on: May 30, 2025 13:39 PM
views 159  views

मालवण : सध्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असून मालवण तहसील कार्यालयाकडून दाखले देण्यात विलंब होत असल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप होत आहे.त्यामुळे उत्पन्न दाखल्यासह इतर दाखले तहसील कार्यालयाने लवकरात लवकर द्यावेत, अशा सूचना माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांना दिल्या. माजी आमदार वैभव नाईक यांनी काल गुरुवारी मालवण तहसील कार्यालयात भेट देऊन दाखले देण्याबाबत होत असलेल्या विलंबाबाबत तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्याशी चर्चा केली.यावेळी नायब तहसीलदार नागेश शिंदे, शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी उपनगरध्यक्ष महेश जावकर, दिपा शिंदे, मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, रेवंडी सरपंच अमोल वस्त, भाग्यश्री खान, देवानंद लुडबे आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी व नागरिकांना विविध दाखले मिळविण्यात येणाऱ्या अडचणी तसेच तहसील कार्यालयाकडून होणाऱ्या विलंबाबाबत तक्रारी मांडल्या. यावेळी वैभव नाईक यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी केलेल्या चर्चेत विविध प्रकारचे सुमारे ५०० दाखले प्रलंबित असल्याची माहिती समोर आली. यावर वैभव नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दाखले लवकरात लवकर देण्यात यावेत अशी सक्त सूचना केली. यामध्ये विदयार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला अत्यावश्यक असून तो तातडीने देण्याबाबत तहसील कार्यालयाने प्राधान्य द्यावे, त्यासाठी आवश्यक इंटरनेट व्यवस्था सुरळीत ठेवावी, विद्यार्थ्यांचे नुकसान होता नये, याची काळजी घ्यावी, असेही वैभव नाईक म्हणाले.

यावेळी महेश जावकर व भाग्यश्री खान यांनी आधारकार्डवरील पत्ता बदलण्यासाठी मुख्याधिकारी यांची सही आवश्यक असताना सहीसाठी तहसीलदारांकडे पाठविले जाते अशी तक्रार मांडली. याबाबत तहसीलदारांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन आवश्यक सही देण्याची सूचना करावी, असे वैभव नाईक यांनी सांगितले.

यावेळी बाबी जोगी यांनी अनेक दाखल्यांसाठी पोलीस पाटील दाखला आवश्यक असताना मालवण शहरात सध्या पोलीस पाटीलच नसल्याने नागरिकांना कुंभारमाठ येथील पोलीस पाटील कडे धाव घ्यावी लागत आहे, अशी तक्रार मांडली. याबाबत वैभव नाईक यांनी पोलीस पाटील दाखल्याऐवजी स्वयंघोषणापत्र ग्राह्य मानले जावे असे सांगितले. यावर तहसीलदार वर्षा झाल्टे यांनीही सहमती दर्शवली. यावेळी विविध दाखले वेळेत देण्यात येतील असे आश्वासन तहसीलदार वर्षा झाल्टे व नायब तहसीलदार नागेश शिंदे यांनी दिले.