...तर सा. बां. वर धडक मोर्चा काढू !

वैभव नाईक यांचा इशारा !
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 13, 2024 15:19 PM
views 56  views

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी बोर्डिंग मैदान येथे हेलिपॅड उभारणीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले. ते करत असताना बोर्डिंग मैदानाची दुरावस्था केली. जिल्हा नियोजन सभेत बोर्डिंग मैदानाच्या दुरुस्तीला मंजुरी न मिळाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर मोर्चा काढणार आहे असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. 


आमदार वैभव नाईक यांनी आज शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत मालवण बोर्डिंग ग्राउंडची पाहणी केली, यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, नितीन वाळके, बाबी जोगी, सन्मेष परब,भाई कासवकर, उमेश चव्हाण, मनोज मोंडकर, सच्चीदानंद  गिरकर, उमेश मांजरेकर, किशोर गावकर, दिलीप चव्हाण, बंड्या सरमळकर, आशुतोष पाटील आदी उपस्थित होते.


यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालवण दौऱयावर आले होते त्यावेळी मालवणात तात्पुरत्या स्वरूपात ३ हेलिपॅड उभारण्यात आली होती. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ४ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते. त्यातील एक तात्पुरते हेलिपॅड मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर उभारण्यात आले. बोर्डिंग ग्राउंड हे मालवणच्या अस्मितेचे ग्राउंड आहे. ग्राऊंडची देखभाल करणाऱ्या लोकांनी मेहनत घेऊन हे ग्राउंड सुस्थितीत ठेवले होते. हेलिपॅडमुळे ग्राउंडची दुरावस्था झाली आहे. मोदी यांच्या दौऱ्यानंतर हेलिपॅड काढून बोर्डिंग ग्राउंड पुन्हा सुस्थितीत करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र अधिकाऱ्यांनी आपले आश्वासन पाळले नाही. चार चार कोटी रुपये हेलिपॅडसाठी खर्च केले जातात या हेलिपॅडच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला हि बाब आहेच, त्याचबरोबर  ग्राऊंडच्या दुरुस्तीवरून देखील अधिकारी टोलवाटोलवी  करत आहेत. जिल्हा नियोजनाची सभा येत्या मंगळवारी आहे. जर या सभेत  ग्राऊंडच्या दुरुस्तीचे  काम मंजूर झाले नाही तर शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.