
देवगड : देवगड तालुक्यातील वळीवंडे येथेकै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांमध्ये लसीकरण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ७४ जनावरांना लस देण्यात आली असून त्यामध्ये ६० गायी आणि १४ म्हशींचा समावेश आहे. या लसीकरण मोहिमेत दाजी वळंजू यांच्या १२ जनावरांना, रघुनाथ पारकर यांच्या ९ जनावरांना, प्रमोद वळंजू यांच्या १८ जनावरांना, गणपत पारकर यांच्या २४ जनावरांना आणि राजू सावंत यांच्या ११ जनावरांना लस देण्यात आली.
गायींना लंपी रोगासाठी Goat Fox Vaccine तर म्हशींना Foot and Mouth Disease (FMD Vaccine) लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेचे मार्गदर्शन डॉ. रमेश श्रीधर पेडणेकर यांनी केले. लसीकरणामुळे जनावरांना गंभीर संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळेल आणि त्यांच्या आरोग्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, असे डॉक्टर पेडणेकर यांनी सांगितले.
या मोहिमेच्या यशस्वी आयोजनात कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील विद्यार्थी अथर्व साळोखे, प्रतीक भोपळे, शुभम पोवार, प्रथमेश पाटील, आदित्य कोळेकर, निहाल पोफळे, गिरीश नाईक, अभी पाटील, गणेश भाकरे आणि प्रथमेश इंगळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या मोहिमेमध्ये वळीवंडे गावांमधील सरपंच व ग्रामपंचायतीचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील विषयतज्ञ आणि प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे मोहिमेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता आली. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रात काम करण्याचा अनुभव मिळाला आणि जनावरांच्या आरोग्य संवर्धनासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.