भूमी अभिलेखमध्ये रिक्त पदं

वैभव नाईक - सतीश सावंतांचा आंदोलनाचा इशारा
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 09, 2025 13:53 PM
views 138  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयात ७० टक्के अधिकारी व कर्मचारीपदे रिक्त आहेत. ८  तालुक्यांपैकी ६ तालुक्यात तालुका भूमिअभिलेख अधिकारी नाहीत. केवळ  २ तालुका भूमिअभिलेख अधिकाऱ्यांवर ८ तालुक्यांचा पदभार आहे. त्यामुळे नागरिकांची जमीन मोजणीची कामे रखडली आहेत. नागरिकांना जमिनीचे नकाशा मिळत नाहीत. महसूल विभागाचे कामकाज संगणकीकृत करण्यात आल्याचे शासन सांगत आहे. मात्र त्यात अनेक त्रुटी असून नागरिकांना एकाच कामासाठी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागत आहेत. एजंटांचा सुळसुळाट होत आहे. त्यामुळे भूमि अभिलेख कार्यालयाने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत. येत्या महिन्याभरात हे प्रश्न सुटले नाही आणि शासनाने भूमिअभिलेखच्या रिक्त पदांवर अधिकारी व  कमर्चारी भरती केली नाही तर जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सिंधुदुर्ग कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयातील कामकाजाच्या बाबतीत नागरिकांच्या श विविध तक्रारी येत असल्याने वैभव नाईक व सतीश सावंत यांनी सोमवारी  ओरोस येथील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सिंधुदुर्ग कार्यालयात भेट दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक उपस्थित नसल्याने भूमि अभिलेखचे उपअधिक्षक विठ्ठल गणेशकर व विनायक ठाकरे यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. यावेळी भूमि अभिलेख कार्यालयातील विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. 

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उबाठा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, अतुल बंगे, बाळू पालव, सिद्धेश राणे, अमित राणे, संजय रावले आदी उपस्थित होते.