
सावंतवाडी: 'आधुनिक तंत्रज्ञानामुळे जीवनात क्रांती झाली आहे, पण मोबाईलच्या अति वापरामुळे अनेक सामाजिक आणि मानसिक समस्या निर्माण होत आहेत,' असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि ॲड. नकुल पार्सेकर यांनी व्यक्त केले. मोबाईलचे दुष्परिणाम आणि समाजमाध्यमांचा वापर या विषयावर नेमळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अटल प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
ॲड. पार्सेकर म्हणाले, "ए.आय.सारख्या तंत्रज्ञानामुळे एका क्लिकवर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात संवाद साधता येतो, हे खरे असले तरी मोबाईलचा गैरवापर वाढत आहे. त्यामुळे सायबर गुन्हे, ताणतणाव, कौटुंबिक कलह, संशय आणि घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी मोबाईलचा वापर आणि समाजमाध्यमांद्वारे व्यक्त होताना काळजी घ्यावी."
याच कार्यक्रमात अटल प्रतिष्ठान संचलित महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक श्रीमती अर्पिता वाटवे यांनीही मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, "मोबाईलमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे आणि शालेय मुलेसुद्धा मोबाईलच्या आहारी जाऊन सायबर गुन्ह्यांमध्ये अडकत आहेत. ज्या वयात मुलांनी करिअरवर लक्ष केंद्रित करायला हवे, त्या वयात ते भरकटत आहेत. अजाणतेपणे जरी एखादा गुन्हा घडला, तरी सुधारित कायद्यानुसार अशा मुलांना बालगृहात पाठवले जाते, ज्यामुळे पालकांनाही मानसिक त्रास होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करताना सावधगिरी बाळगावी."
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना बोवलेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि अटल प्रतिष्ठानसारख्या संस्थांकडून शाळाशाळांमध्ये राबवण्यात येत असलेल्या अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे कौतुक केले. यावेळी नेमळे पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत प्रभू तेंडोलकर, सामाजिक कार्यकर्त्या मानसी परब, अटल प्रतिष्ठानच्या कार्यालयीन प्रमुख ज्योती राऊळ, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अनिल कांबळी यांनी केले.










